आईचे दुःख ते...! डोळ्यासमोर आपल्या मुलाचा मृत्यू पाहून हत्तीणीला अश्रू झाले अनावर; रडत सकाळपर्यंत ट्रकला खिळून राहिली; Video Viral
स्वामी तिन्ही जागांचा आईविना भिकारी! ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. आपली आई हे आपल्यासाठी आपले सर्वस्व असते. आईसारखे निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही म्हणूनच आईला ममतेचे प्रतीक मानले जाते. ममत्वाने भरलेली हीच आई वेळ आली तर आपल्या मुलांसाठी जगाशीही लढायला मागेपुढे बघत नाही. आपल्या मुलाला जरा जरी खरचटले तर आईला दुःख होते अशात तिच्या डोळ्यादेखत जर तिचा मुलगा तिच्याकडून हिरावून घेतला तर तिचे काय होईल याचा विचार करा…
नुकतीच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक घटना शेअर करण्यात आली आहे जिने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. मलेशियन व्यक्तीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात एका हत्तीणीने आपले मुलं हरपल्याचे सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ रात्रीचा आहे, ज्यामध्ये एक हत्तीचे पिल्लू ट्रकखाली चिरडले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या आईने जेव्हा हे भयाण दृश्य पाहिले तेव्हा ती निस्तब्ध झाली, वेदनेनं तिचं काळीज हादरलं आणि आपल्या मृत मुलाजवळ ती शांतपणे उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि हे दृश्य पाहून ती आपल्या मुलाला शेवटचा निरोप देत असल्याचे भासून आले. मुलगा जाण्याचे दुःख तिला इतके लागले की काही केल्या ती तिथून हटायलाच तयार झाली नाही आणि एकटक ट्रकला डोकं लावत रडत राहिली.
दुर्घटना घडल्याच्या काही वेळाने वन विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, परंतु आई हत्तीणी एक इंचही हलली नाही. ती तिथे शांतपणे उभी राहिली, तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जणू काही ती तिच्या मुलाला शेवटचा निरोप देत होती. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. सोशल मीडियावर हे दृश्य @ajpyro नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला चांगले व्युज मिळाले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की घटनास्थळी असलेले लोक परिस्थिती हाताळताना तिच्याशी दयाळूपणे आणि सौम्यतेने वागतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.