(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओ शेअर केले जातात. हे व्हिडिओ बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडचे निघतात. दरम्यान आता इथे एक भयाण दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्याने सर्वांनाच थरकाप उडवला. वास्तविक, आजकाल लोकांमध्ये पाळीव प्राणी पाळण्याचा ट्रेंड फार वाढत आहे. आपल्या आवडीनुसार लोक प्राण्यांना घरी आणून त्यांची देखभाल करू लागतात मात्र असे करताना त्यांची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. प्राणी कधी काय करतील ते सांगता येत नाही.
अशीच एक धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडून आली आहे जिथे एका रॉटविलर कुत्र्याने ४ महिन्यांच्या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली, ज्यांनंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे लाइव्ह फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, जे वेगाने व्हायरल होत आहे.
हथिजन सर्कल येथील राधे रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रतीक दाभी यांची ४ महिने १७ दिवसांची मुलगी ऋषिका हिला तिच्या बहिणीने मांडीवर घेऊन घराबाहेर नेले. त्याच वेळी, जवळच राहणारी एक महिला तिच्या रॉटविलर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर आली. ती महिला फोनवर बोलत असताना कुत्र्याचा पट्टा तिच्या हातातून निसटला आणि कुत्र्याने मुलीवर आणि तिच्या मावशीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये रात्री ९ वाजताच्या सुमारास, रॉटविलर कुत्रा त्याच्या मालकाच्या हातातून सुटतो आणि अनियंत्रित होतो आणि समोरील लोकांवर हल्ला करतो. हल्ल्यांनंतर आजूबाजूची सर्व लोक चिमुकलीला वाचवण्यासाठी धाव घेतात आणि तिथे एकाच गोंधळ माजतो.
दरम्यान अहमदाबाद महानगरपालिकेच्या नियमांनुसार, सर्व पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. आता हा रॉटविलर कुत्रा त्याच्या मालकाने महापालिकेत नोंदणीकृत केला होता की नाही हे तपासाचा विषय आहे. मुलीच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबाने विवेकानंद पोलिस ठाण्यात कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच, सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना एक अर्ज देऊन कुत्र्याच्या मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, हा कुत्रा बऱ्याच काळापासून तेथील लोकांना त्रास देत आहे आणि अलिकडच्या काळात त्याने दोन लोकांना चावले आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. आता मुलीच्या मृत्यूनंतर लोक कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
અમદાવાદના હાથીજણમાં રાધે રેસીડેન્સીમાં પાલતું શ્વાને કાળો કેર વર્તાવ્યો. 4 મહિનાની બાળકી અને કાકી પર કર્યો હુમલો, બાળકીનું મોત… #Ahmedabad #Gujarat #Dog #AMC pic.twitter.com/mkiLAjI77l
— Rakesh Parmar 🇮🇳 (@DRakesh1011) May 13, 2025
घटनेचा व्हिडिओ @DRakesh1011 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुर्दैवाने भारतात माणसांना गायी आणि कुत्र्यांपेक्षा कमी किंमत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सरकार आजकाल कोणतीही कारवाई का करत नाही, दिवसेंदिवस अनेक घटना बातम्यांमध्ये येत आहेत?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.