(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Paragliding Rescue Video: पॅराग्लायडिंग करत उंच आकाशातून पर्वत आणि निसर्गाचे सुंदर दृश्य पाहण्याचा अनुभव अनेकांना आकर्षित करतो. मात्र, या साहसी खेळात छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. सध्या सोशल मीडियावर पॅराग्लायडिंगदरम्यान घडलेल्या अशाच एका थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका रशियन पॅराग्लायडरचा हवेतच तारांमध्ये अडकल्याचा व्हिडीओ समोर आला असून, त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर SDRF पथकाने त्याची सुटका केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये एक रशियन पॅराग्लायडर उंचावर असलेल्या तारांमध्ये अडकलेला दिसत आहे. तो इतक्या उंचीवर अडकला होता की स्वतःहून खाली उतरणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी रस्ता बंद करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती संपूर्ण घटनेची माहिती देताना दिसत आहे. पॅराग्लायडर ज्या उंचीवर अडकला होता, तिथपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने त्याच्या बचावासाठी हेलिकॉप्टरची गरज भासू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.
उंच क्रेनच्या मदतीने सुरू केलं बचावकार्य
या घटनेचा दुसरा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये बचाव पथक पॅराग्लायडरपर्यंत पोहोचण्यासाठी उंच क्रेनचा वापर करताना दिसत आहे. क्रेन हळूहळू वर नेऊन बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर पथकातील सदस्य त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण बचावकार्यासाठी SDRF पथकाला जवळपास तीन तास लागले.
या घटनेचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये पॅराग्लायडर इतक्या उंचीवर अडकलेला पाहून अनेकांनी त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये बचाव पथकाने केलेली मेहनत पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.
एका युजरने गंमतीने, “आकाशातून खाली सोडले, खजुराच्या झाडावर अडकले,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने बचावकार्याचा व्हिडीओ पाहून हा दिवसातील सर्वात सुंदर व्हिडीओ असल्याचं म्हटलं.
या घटनेने साहसी खेळांचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.






