7 Punjabi travelers shot dead in Pakistan by Gunmen
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटना काही नवीन नाहीत. बलुचिस्तान प्रदेशातून आतापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा आणखी एक धक्कादायक घटना बलुचिस्तानमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 पंजाबींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून यामध्ये आणखी सहा जण जखमी झाले आहेत. बलुच आर्मी सैनिकांनी या व्यक्तींना ओळख विचारल्यानंतर त्यांची हत्याही केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बरखान जिल्ह्यातील रडकान भागात राष्ट्रीय महामार्गावर काही अज्ञात हल्लेखोरांनी एका प्रवासी वाहनाला थांबवले आणि त्यातील सात पंजाबी प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केली. आधी त्यांना त्यांची ओळख विचारण्यात आली आणि नंतर त्यांची हत्या केली गेली. यामुळे संपूर्म परिसरात भितीचे सावट निर्माण झाले आहे.
घटना कशी घडली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी आधीच हल्ल्याची योजना आखली होती. राष्ट्रीय महामार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना ते टार्गेट करत होते. तसेच त्यांनी संबंधित प्रवासी वाहनाला रोखले. नंतर प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे कागदपत्र तपासण्यात आले. विशेषतः पंजाबी प्रवाशांची ओळख पटवून त्यांना थेट गोळ्या घालून ठार करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण जातीय द्वेषावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.
बलुचिस्तानमध्ये वाढता हिंसाचार
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा दलांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेतली. सध्या परिसरात नाकबंदी करण्यात आली असून घटनेची चौकशी सुरु आहे. बलुचिस्तानमधे जातीय तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाढवळ्या पंजाबी समुदायांवर हल्ले केले जात आहेत. बलुच विद्रोही गट पंजाब आणि पाकिस्तान सरकारविरोधात उठाव करत असून, पंजाबी लोकांना टार्गेट करत आहेत.
यापूर्वीही घटना घडल्या आहेत
बलुचिस्तानमध्ये ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात पंजाबी लोकांची हत्या करण्यात आली आहे. यापर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अशाच एका हल्ल्यात 23 नागरिकांना ठार करण्यात आले होते. विद्रोह्यांनी दावा केला आहे की, पंजाबमधून आलेले लोक त्यांची संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात आणत आहेत.
या घटनांमुळे पाकिस्तानच्या प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणावर अशा घटना रोखण्यात अपयश आलयाने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बलुचिस्तानमध्ये सुरक्षा वाढवण्याच्या अनेक घोषणा केल्या गेल्या, मात्र तरीही अशा हिंसक घटनांचे प्रमाण वाढतच आहे. या घटनेने पाकिस्तानमधील जातीय विद्वेष आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. सध्या तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.