Arakan Army landmines on the Myanmar-Bangladesh border injured 18 Bangladeshis by June
Arakan Army landmines : भारताच्या शेजारील म्यानमार आणि बांगलादेश सीमेवर धोक्याची सावट आणखी गडद होत चालले आहे. म्यानमारच्या अराकान आर्मी या बंडखोर संघटनेने मोठ्या प्रमाणात जमिनीखाली भूसुरुंग (लँडमाइन्स) बसवले असल्याचे अलीकडे उघड झाले आहे. या भूसुरुंगांचा थेट फटका सीमावर्ती भागातील निरपराध नागरिकांना बसत असून, त्याचे परिणाम चिंताजनक आहेत.
बांगलादेशी वृत्तपत्र ‘द डेली स्टार’ च्या माहितीनुसार, फक्त गेल्या सहा महिन्यांत या सीमेवर भूसुरुंगांमुळे किमान १८ लोक जखमी झाले आहेत. २०२४ मध्ये तर दोन नागरिकांना प्राणहीन व्हावे लागले होते. यातील बहुतांश पीडित हे बांगलादेशी नागरिक आणि सीमेवरून जाणारे रोहिंग्या निर्वासित होते.
अराकान आर्मी ही संघटना म्यानमारमध्ये स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे. ती थेट म्यानमारच्या जुंता सैन्याशी युद्ध छेडत असून, त्यासाठी विविध डावपेच वापरत आहे. रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी तस्कर त्यांच्या नियंत्रणाखालील भागात सतत येत असल्याने हे थांबवण्यासाठीच अराकान आर्मीने जमिनीखाली भूसुरुंग पेरले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crimea for Russia and Ukraine: क्रिमियावरून सुरू झाले रशिया – युक्रेन युद्ध; काय आहे ‘या’ प्रदेशाचे धोरणात्मक महत्त्व?
ह्यूमन राईट्स वॉचच्या अहवालानुसार, म्यानमार सध्या जगातील भूसुरुंगांच्या दृष्टीने सर्वात धोकादायक देश मानला जातो. २०२३ मध्येच भूसुरुंगांमुळे तब्बल १,००३ नागरिकांचा मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याचे प्रकार नोंदले गेले. अनेक भागात प्रत्येक ३०० यार्ड अंतरावर भूसुरुंग बसवले गेले असून, बांगलादेशी लष्कराच्या अंदाजानुसार, म्यानमारने आपल्या २११ किमी सीमेवर हे ‘स्फोटक जाळे’ तयार केले आहे.
१९९७ मध्ये कॅनडातील ओटावा येथे जागतिक करार झाला होता, ज्यामध्ये भूसुरुंग लावण्यावर कठोर नियम घालण्यात आले होते. त्यानुसार, केवळ दोन राष्ट्रांमध्ये औपचारिक युद्ध सुरू असल्यासच जमिनीखाली भूसुरुंग बसवता येतात. परंतु म्यानमारचे सध्या कोणत्याही बाह्य देशाशी युद्ध सुरू नाही. येथे केवळ जुंता सैन्य आणि बंडखोर संघटना परस्परांविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे म्यानमारमधील ही घडामोड आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन मानली जात आहे.
भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा म्यानमार व बांगलादेशाशी जवळचा भौगोलिक संबंध आहे. त्यामुळे या सीमावर्ती भागातील अस्थिरता थेट भारताच्या सुरक्षेलाही आव्हान देऊ शकते. विशेषतः रोहिंग्या प्रश्न, मादक पदार्थांची तस्करी आणि बंडखोरांचे हालचाली यामुळे भारताने या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे अत्यावश्यक झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
भूसुरुंगांचा सर्वाधिक फटका निरपराध शेतकरी, सीमापार जाणारे निर्वासित, महिला आणि मुले यांना बसतो. युद्ध लढणाऱ्या गटांसाठी हे एक ‘रणनीतीचे अस्त्र’ असले तरी त्याचा तडाखा सर्वसामान्यांवरच जास्त होतो. त्यामुळे मानवाधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय संस्था म्यानमारवर दबाव आणण्याची मागणी करत आहेत. भारताच्या शेजारील या “स्फोटक परिस्थिती” मुळे एकच प्रश्न उभा राहतो – दक्षिण आशियात शांतता कधी आणि कशी प्रस्थापित होणार?