
९९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशाने बकरी ईदवर घेतला मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)
ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईद या महिन्याच्या ६ आणि ७ तारखेला साजरी केली जाणार आहे. या दिवशी इस्लामचे अनुयायी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देतात. मात्र असा एक मुस्लिम देश असून ज्यांनी बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही प्राण्यांची कुर्बानी देणार नाही, असा मोठा निर्णय घेतला आहे. ९९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इस्लामिक देश मोरोक्कोने बकरीबाबत कडक आदेश दिले आहेत की कोणताही नागरिक ईदवर बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देऊ नये, त्यानंतर बकरी शोधण्यासाठी देशभर छापे टाकले जात आहेत.
मोरोक्कोचे राजा मोहम्मद सहावे यांच्या शाही फर्मानावर लोक खूप संतापले आहेत. कारण त्यांच्या आदेशानंतर सुरक्षा दलांनी अनेक शहरांमध्ये कुर्बानी थांबवण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. अल्लाहच्या मार्गात आपल्या प्रिय असलेल्या गोष्टीची कुर्बानी देण्याचे महत्त्व समजून घेणे हा त्याचा उद्देश आहे. बकरी ईद मुस्लिमांना त्यांचे कर्तव्य बजावण्याचा आणि अल्लाहवर विश्वास ठेवण्याचा संदेश देते.
भीषण दुष्काळामुळे प्राण्यांची संख्या कमी होत असल्याने मोहम्मद सहावा यांनी हा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी राजाने म्हटले आहे की, लोकांनी या आठवड्यात (6-7 जून) येणारा बकरी ईदचा सण प्रार्थना आणि दान करून साजरा करावा आणि बलिदान टाळावे. राजाच्या या निर्णयानंतर अधिकाऱ्यांनी जनावरांच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि कुर्बानीसाठी गुप्तपणे आणलेल्या मेंढ्या घरातून जप्त करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या कृतींमुळे लोक खूप संतापले आहेत आणि निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत.
मुस्लिम जगतानेही मोहम्मद सहावा यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे आणि त्याला एक धोकादायक उदाहरण म्हटले आहे. ते असेही म्हणतात की सरकार धार्मिक रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप करत आहे. काही लोक सरकारच्या निर्णयाशी सहमत आहेत आणि आर्थिक आणि आरोग्य परिस्थिती लक्षात घेऊन निर्णयाचा बचाव करत आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.