Baloch leader warns Pakistan Army Chief Munir citing Bangladesh over threats to Balochistan
Baloch leader warns Munir : भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी बलुचिस्तानमधील फुटीरतावादींना दिलेल्या धमकीनंतर आता बलुच नेते सरदार अख्तर मेंगल यांनी त्यांना थेट आणि जळजळीत प्रत्युत्तर दिले आहे. मेंगल यांनी पाकिस्तानच्या लष्कराला १९७१ च्या भारत-पाक युद्धातील अपमानास्पद पराभवाची आठवण करून देत स्पष्ट इशारा दिला की, “बांगलादेश विसरू नका!”
गेल्या महिन्यात इस्लामाबादमध्ये प्रवासी पाकिस्तानी परिषदेत जनरल मुनीर यांनी भाषणात बलुचिस्तानातील फुटीरतावादी गटांवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की, “बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या कपाळावरील झुंबर आहे. तुम्ही १५०० लोक म्हणताय की आम्ही पाकिस्तानकडून हे वेगळं करणार आहोत, पण तुमच्या पुढच्या दहा पिढ्याही ते करू शकणार नाहीत.” पुढे त्यांनी धमकीच्या स्वरात म्हटले, “आम्ही असं काही करू की बलुचिस्तानच्या १० पिढ्यांना ते लक्षात राहील.”
बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि पाकिस्तानच्या माजी खासदार सरदार अख्तर मेंगल यांनी एका जाहीर रॅलीत जनरल मुनीर यांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराला १९७१ मध्ये भारतासोबत झालेल्या युद्धातील शरमेचा पराभव आणि ९०,००० सैनिकांचे आत्मसमर्पण आठवून दिले.
“जनरल मुनीर साहेब, तुम्ही बलुचांना धमक्या देता, पण आम्ही ७५ वर्षांपासून तुमचे प्रत्येक अत्याचार लक्षात ठेवतोय. पण तुम्ही १९७१ चं विसरलात का? बांगलादेशात बंगालींनी तुमच्याशी काय केलं, ते आठवा… आणि ते तुमच्या पुढील दहा पिढ्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे,” असं मेंगल यांनी रोखठोक सांगितलं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राष्ट्रीय असेंब्लीची आपत्कालीन बैठक; शाहबाज सरकारला PTIचा पाठिंबा मिळणार का?
मेंगल यांनी पुढे पाकिस्तान लष्कराच्या पराभवाचा उल्लेख करत म्हटले, “जगातल्या कोणत्याही युद्धात ९०,००० सैनिकांनी एकत्र येऊन शस्त्रास्त्रं टाकलेली उदाहरणं नाहीत, पण तुमच्या सैन्याने टाकली. एवढंच नाही, तर आजतागायत लोक म्हणतात की त्यावेळी केवळ शस्त्रेच नव्हे, तर त्यांच्या पँटही लटकल्या होत्या.” मेंगल यांनी जनरल मुनीर यांना आवाहन केलं की, “हा इतिहास तुमच्या लष्कराच्या पाठ्यपुस्तकांत लिहा, जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्यांना हा अपमान लक्षात राहील.”
मेंगल यांनी पाकिस्तान सरकारच्या खोट्या प्रचारावरही टीका केली. “पाकिस्तान युद्ध हरला होता, पण सरकारी टीव्ही आणि रेडिओवर मात्र सांगितलं जात होतं की आपण भारताचे काही क्षेत्र जिंकलं आहे. अशी फसवणूक आम्ही किती काळ सहन करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : What Is Western Disturbance : नक्की काय आहे हा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’? ज्यामुळेच भारतात पडतो पाऊस
जनरल असीम मुनीर यांच्या जहरी वक्तव्यामुळे बलुचिस्तानमधील असंतोष अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. मेंगल यांची प्रतिक्रिया ही केवळ बलुच असंतोषाची अभिव्यक्ती नसून, पाकिस्तानच्या लष्करी दडपशाहीविरुद्धचा जळफळाट आहे. भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानचा आवाज अधिक तीव्र होत असून, पाकिस्तानच्या लष्करासाठी ही एक नवी डोकेदुखी ठरू शकते. पाकिस्तानने जर बलुच प्रश्नाला दडपशाहीने हाताळण्याचा प्रयत्न केला, तर तो इतिहास पुन्हा घडू शकतो – ज्यात लाज आणि पराभव याशिवाय काही उरत नाही.