भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राष्ट्रीय असेंब्लीची आपत्कालीन बैठक; शाहबाज सरकारला पीटीआयचा पाठिंबा मिळणार का? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Pakistan tensions : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना पाकिस्तान सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता इस्लामाबादमधील संसद भवनात राष्ट्रीय असेंब्लीची विशेष आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
ही बैठक पाकिस्तानचे राष्ट्रपती यांनी बोलावली असून, यात पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, सर्व पक्षांचे नेते, मंत्री, तसेच सुरक्षा तज्ञ सहभागी होणार आहेत. यावेळी भारतासोबत निर्माण झालेला गंभीर तणाव, लष्करी प्रतिक्रिया, घरगुती सुरक्षेची रणनीती, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न यावर चर्चा होणार असल्याचे समजते.
काश्मीरमधील पहलगाम येथे घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचे राजनैतिक संबंध तोडले असून, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देशाबाहेर पाठवले आहे. याशिवाय, भारताने सिंधू जल करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार दशकांपासून दोन्ही देशांमध्ये अस्तित्वात होता, मात्र आता तोही भारताने थांबवला असून, या निर्णयाने पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : International Firefighters’ Day : कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक? वाचा त्यांची प्रेरणादायक कहाणी
भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासह पाक लष्कर अनेक गुप्त बैठका घेत आहे. तसेच सीमेवर सायरनची यंत्रणा बसवली जात आहे आणि क्षेपणास्त्र चाचण्याही वाढल्या आहेत. बिलावल भुट्टो यांनी तर सिंधू नदीत पाण्याऐवजी रक्त वाहेल, असा उन्मादी इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तान सरकारची चिंता आणि अस्थैर्य उघडपणे समोर येते.
या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष आहे ते इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाकडे. सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या अनुपस्थितीत पीटीआय सरकारविरोधात ठाम आहे. या बैठकीत शाहबाज शरीफ यांना संसदीय पातळीवर पीटीआयचा पाठिंबा मिळेल की नाही, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आणि विरोधकांमध्ये सहकार्य अत्यावश्यक आहे. पण याआधीच्या अनेक सुरक्षाविषयक बैठकींमध्ये पीटीआयने बहिष्कार दर्शवला आहे. यामुळेच या वेळेसही ते सहभागी होतील का, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रपतींच्या विशेष निमंत्रणावर पीटीआय काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतासोबत मोठे युद्ध होणार नाही, पण…’ पाकिस्तानच्या माजी NSAने का केला असा दावा?
भारताच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानमध्ये सुरू असलेली अस्वस्थता, दहशतीचं वातावरण, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अडचणी पाहता पाकिस्तानसाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे. जर यावेळीही देशातील प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले नाहीत, तर पाकिस्तानची अंतर्गत एकजूट ढासळू शकते. शाहबाज शरीफ सरकारला पीटीआयचा पाठिंबा मिळतो का, आणि भारताच्या रोषाला उत्तर देण्यासाठी काय रणनीती आखली जाते, यावरच पाकिस्तानच्या आगामी सुरक्षा धोरणाचे भविष्य ठरणार आहे.