Bangladesh Hindu violence: हिंदुच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या चिन्मय दास यांनाअटक; देशद्रोहाचा गुन्हा दाखल
ढाका: बांगलादेश पोलिसांनी ढाका येथे हिंदू समूहाचे ‘सम्मिलित सनातनी जोत’चे नेते आणि इस्कॉन ट्रस्टचे सचिव चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे हिंदू समाजातील लोकांनी या विरोधात निदर्शने काढली. हिंदू समाजातील लोकांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेची मागणी केली. याच दरम्यान हिंदूवरही हल्ले करण्यात आले आहे. यामध्ये एक प्राध्यपक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चिन्मय कृष्ण दास यांनी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेश गुप्तहेर विभागाने चिन्मय यांना ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. अटकेनंतर त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. एका बांगलादेशी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिन्मय दास हे ISKCON ट्रस्टचे प्रमुख होते, मात्र त्यांना अलीकडेच त्यांच्या पदावरून निष्कासित करण्यात आले होते.
चिन्मय दास ब्रह्मचारी आणि चटगाव जिल्ह्यात हिंदू संघटनांचे अन्य 19 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 25 ऑक्टोबर रोजी चितगाव येथे आयोजित रॅलीमध्ये बांगलादेशच्या ध्वजाच्या वर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळे बांगलादेशाच्या धव्जाचा अपमान झाला आणि त्यानंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना अटक करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
भारताला हस्तक्षेप करण्याचे आवाहन
ISKCON च्या वतीने एका अधिकृत निवेदनात जाहीर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशातील चिन्मय कृष्ण दास यांची अटक वावगे आरोप लावून करण्यात आली आहे. ISKCON ने भारत सरकारकडून बांगलादेश सरकारशी तात्काळ संपर्क साधण्याची मागणी केली आहे. ISKCON ने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या संस्थेचा कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाशी काहीही संबंध नाही. यामुळे असा निराधार आरोप करणे संतापजनक आहे. यामुळे भारताने तातडीने बांगलादेश सरकारशी याबाबत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
हिंसक संघर्ष
बांगलादेश हिंदू बौद्ध ईसाई एकता परिषदेकडून चिन्मय यांच्या अटकेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. त्यांचा दावा आहे की, या अटकेमुळे बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब होईल. चिन्मय यांना अटक केल्याच्या विरोधात बांगलादेशातील हिंदू समुदायाने सुमारे 300 लोकांची रांग जाऊन शाहबाग चौकावर मोर्चा काढला. त्यात हिंसक संघर्ष झाले आणि अनेक लोक जखमी झाले. या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायात चिंता व्यक्त केली जात आहे.