मालदीव: काळी बाहुली सध्या मालदीवमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर काळी जादू झाल्याच्या बातमीने तेथील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. फातिमा शमनाज अली सलीम असे आरोपी महिलेचे नाव आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर महिला मंत्र्यालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या जवळ येण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
दरम्यान, फातिमा यांनी काळी जादू करण्यासाठी या वस्तूंचा वापर केल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमनाझ यांना राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्यावर काळी जादू करून त्यांच्या निकटवर्तींयांच्या वर्तुळात प्रवेश मिळवायचा होता. यासोबतच मुइज्जू सरकारमध्ये त्यांना महत्त्वाचे पदही मिळवण्याचा हेतूने त्यांनी त्या काळ्या जादूची मदत घेतली असावी, असे बोलले जात आहे. पण या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर शमनाझ यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी करत त्यांच्या घरातून काळी बाहुली आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. यानंतर हे प्रकरण चांगलेच तापू लागल्यानंतर अक्षरश: मालदीवच्या इस्लामिक मंत्रालयाला स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले.
मालदीवच्या इस्लामिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काळ्या बाहुलीचा काळ्या जादूशी काहीही संबंध नाही. मालदीवच्या माजी राज्यमंत्री फातिमा शमनाझ यांच्यावर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप असून त्यांना या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्रालयातील माजी राज्यमंत्री फातिमा शमनाज आणि त्यांच्या बहीण इव्ह सना सलीम यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या बाहुल्यांसोबत काळी जादू केल्याचा कोणताही पुरावा नाही, असे इस्लामिक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तर फातिमा शमनाज यांचे वकील अली शाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी आतापर्यंत कोणताही पुरावा सादर केलेला नाही आणि घरातून जप्त केलेल्या काळ्या बाहुलीमध्ये जादूचे कोणतेही चिन्ह सापडले नाही. घरातून जप्त करण्यात आलेल्या बाहुल्या आणि इतर वस्तूंमध्ये काळी जादू किंवा शिर्क (इतर प्राण्यांना देवाचे सहकारी म्हणून स्वीकारणे) संबंधित काहीही आढळलेले नाही, अशी नोंद करण्यात आली आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे फातिमा शमनाज यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. शमनाझ आणि त्यांची बहीण सना यांच्यावर लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी जादूटोण्याचा वापर केल्याचा आरोप होता. फातिमा शमानाझ यांच्यासह तिघांना राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि नंतर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पर्यावरण मंत्री फातिमा शमनाझ यांनी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.
पर्यावरण मंत्री होण्यापूर्वी फातिमा शमनाझ या माले सिटी कौन्सिलमध्ये हेनविरू साऊथच्या नगरसेवक होत्या. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी मुइज्जू सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारण्यासाठी त्यांनी कौन्सिलचा राजीनामा दिला होता. याआधीही फातिमा शमनाज यांनी राष्ट्रपती कार्यालयातही महत्त्वाचे पद भूषवले होते.