Bomb threat forces Air India AI379 to make emergency landing at Phuket Airport
Air India Flight Bomb Threat : थायलंडमधील फुकेत विमानतळावर शुक्रवारी एकच खळबळ उडाली, जेव्हा दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI379 विमानात ‘F* you all bomb’** असा मजकूर असलेली चिठ्ठी सापडली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली असून, संपूर्ण विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी उच्च सतर्कता बाळगली आहे.
ही चिठ्ठी विमानाच्या शौचालयात आढळून आली असून, एका क्रू मेंबरने ती सकाळी १० वाजता पाहिल्यानंतर पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर सकाळी १०:३५ वाजता एअर इंडियाने आपत्कालीन योजना सक्रिय केली. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. AI379 हे विमान ११:३७ वाजता फुकेत विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
विमान खाली उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सुरक्षेसाठी विमानाची सखोल झडती घेण्यात आली. फुकेत विमानतळाचे महाव्यवस्थापक मोंचाई तनोडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “धमकी अतिशय गंभीर होती. विमान खाली आल्यानंतर त्वरित सुरक्षा यंत्रणांना सक्रिय करण्यात आले. सध्या पोलिस आणि अन्य तपास यंत्रणा धमकी कोणाने दिली हे शोधत आहेत.” धमकीखोराने वापरलेली भाषा देखील संशय वाढवणारी आहे. चिठ्ठीत ‘F* you all bomb’** असा स्पष्ट उल्लेख होता. ही चिठ्ठी केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर सुरक्षा व्यवस्थेलाही आव्हान देणारी होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Popeye’ क्षेपणास्त्र बनले इस्रायलचे ब्रह्मास्त्र, इराणी रडार उद्ध्वस्त; भारत-इस्रायल कारवायांमध्ये धक्कादायक साम्य
सध्या इराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. परिणामी, भारतातून अमेरिका, युरोप किंवा कॅनडाकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांना मार्ग बदलावा लागत आहे किंवा काही वेळा थेट परतीचे उड्डाण करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, अशा धमक्या विमान प्रवाशांमध्ये भीती वाढवणाऱ्या ठरत आहेत. एअर इंडियाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, “घाबरू नका, शांतता राखा. आम्ही सर्व प्रकारची मदत पुरवत आहोत.”
विशेष बाब म्हणजे, या प्रकाराच्या एक दिवस आधीच अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला होता. लंडनला जाणारे AI-171 हे विमान गुरुवारी दुपारी १:३८ वाजता उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. या भीषण दुर्घटनेत २४२ पैकी फक्त एक प्रवासी वाचला, तर अन्य सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद बाब आहे. अपघाताची चौकशी सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी फुकेतहून येणाऱ्या विमानाला धमकी मिळणे, ही घटना देशातील विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
सध्या थायलंड पोलिस आणि सुरक्षा एजन्सी धमकीमागील व्यक्ती किंवा गटाचा शोध घेत आहेत. चिठ्ठी कशी ठेवली गेली? ती आतूनच लिहिली गेली की आधीच ठेवलेली होती? यावर तपास सुरू आहे. या संदर्भात सुरक्षा उपाय अधिक कठोर करण्यात येणार असून, विशेषतः आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर जास्त लक्ष ठेवण्यात येईल, असे एअर इंडियाने संकेत दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलचा थेट इराणच्या छाताडावर वार; ‘Iranian octopus’चे सैन्य तयार, ‘Gulf countries’ युद्धाच्या छायेत
फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या AI379 विमानातील ‘बॉम्ब नोट’ हा प्रकार घातपाताच्या संभाव्य इशाऱ्याप्रमाणे गंभीरपणे घेतला जात आहे. मागील अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही दुसरीच मोठी घटना असल्यामुळे, विमान प्रवासावरील विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी विमान कंपन्यांना अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. यात्रेकरूंच्या जीवित सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.