इस्रायलचा थेट इराणच्या छाताडावर वार; 'Iranian octopus'चे सैन्य तयार, 'Gulf countries' युद्धाच्या छायेत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Israel strikes Iran nuclear bases : इराण-इस्रायल संघर्ष आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. शुक्रवारी इस्रायलने इराणवर थेट हवाई हल्ला केला असून, यामध्ये इराणचे अणुशास्त्रज्ञ आणि आयआरजीसीचे वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात इराणमधील सर्वात महत्त्वाचे आणि धोकादायक मानले जाणारे नतान्झ अणुऊर्जा केंद्र संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, अशी पुष्टी इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांनी केली आहे. हा हल्ला केवळ लष्करी नव्हे, तर भौगोलिक आणि राजकीय दृष्टिकोनातूनही निर्णायक मानला जात आहे. इस्रायलच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियात अस्थिरता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नतान्झ हे केंद्र इराणच्या मध्य भागात, राजधानी तेहरानपासून सुमारे २२० किलोमीटर अंतरावर वसले आहे. हे युरेनियम समृद्ध करण्यासाठी बांधले गेलेले एक उच्च-संरक्षित केंद्र असून, येथे अनेक भूमिगत सुविधा आणि हजारो सेंट्रीफ्यूज बसवण्यात आलेल्या होत्या. या माध्यमातून इराणने ३.५% ते ६०% पर्यंत युरेनियम समृद्ध केले होते. अणुबॉम्ब तयार करण्यासाठी सुमारे ९०% शुद्धतेचे युरेनियम आवश्यक असते, आणि त्यामुळे नतान्झ केंद्रावर सतत आंतरराष्ट्रीय लक्ष केंद्रित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War News Live : इराणचे हालही होणार हिरोशिमा, नागासाकी सारखे? इस्रायलच्या भीषण अणुहल्ल्यानंतर जगभरात चर्चा
या हल्ल्याने इराणच्या आण्विक क्षमतेवर मोठा आघात केला आहे. इस्रायलने यापूर्वीही या केंद्रावर हल्ल्याचे प्रयत्न केले होते. २०१० मध्ये स्टक्सनेट व्हायरसद्वारे सायबर हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे शेकडो सेंट्रीफ्यूज यंत्रे नष्ट झाली होती. त्यानंतर २०२० मध्ये आणि पुन्हा २०२१ मध्ये संशयास्पद स्फोट झाले होते, ज्याचे खापर इस्रायलवर फोडले गेले होते. मात्र, या वेळेस इस्रायलने थेट हवाई कारवाई केली असून, इराणच्या अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू आणि नतान्झ केंद्राचा विनाश ही अत्यंत मोठी घटना मानली जात आहे.
या हल्ल्याच्या एक दिवस आधीच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ने इराणवर २० वर्षांतील सर्वात कठोर टीका केली होती. IAEA ने म्हटले होते की तेहरान त्यांना आवश्यक ती माहिती व सहकार्य देत नाही. त्याला प्रत्युत्तर देताना इराणने युरेनियम समृद्धीकरण वाढवण्याची धमकी दिली होती आणि नवीन प्रगत सेंट्रीफ्यूज बसवण्याची योजना जाहीर केली होती. आता या हल्ल्यामुळे इराणचे नेतृत्व आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
या घटनेपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये परमाणु करारावरील नव्या चर्चांचा प्रयत्न सुरू होता. अमेरिका, इराणवर लादलेले निर्बंध काही अंशी शिथिल करण्याच्या बदल्यात, युरेनियम समृद्धीकरण थांबवण्याची अपेक्षा करत होती. मात्र आता, इस्रायलच्या हल्ल्यानंतर राजनैतिक वाटाघाटी थांबण्याची शक्यता वाढली आहे. इराणने जर उत्तरादाखल कठोर लष्करी कृती केली, तर संपूर्ण पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran Row: इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण चवताळला, 100 हून अधिक स्फोटक ड्रोनने हल्ला, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही सज्ज
नतान्झ केंद्रावर झालेला हल्ला हे केवळ एक लष्करी अभियान नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एक गंभीर इशारा आहे. इराण-इस्रायल संघर्ष आता उघडपणे आण्विक पातळीवर पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यानंतर इराणचा पुढील पवित्रा काय असेल, यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेची भूमिका, रशियाचे समर्थन आणि चीनची प्रतिक्रियाही या संघर्षात महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर जगाला आण्विक संघर्षाच्या उंबरठ्यावर आणणारा एक अत्यंत गंभीर क्षण उजेडात आला आहे.