China urges India to prioritise border issue within bilateral relations
बिजिंग: चीन आणि भारत संबंधांमध्ये नेहमीच तफावत राहिली आहे. एकीकडे भारत चीनसोबत LAC करारावर शांततेचा मार्ग काढत असून चीनकडूनही सकारात्मक भूमिका पाहायला मिळत आहे. दरम्यान चीनचे दूतावास प्रमुख वांग ली यांनी भारत-चीन संबंधांबाबत एक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी दोन्ही देशांमधील शांतता, व्यापार आणि सहकार्याला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी त्यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी सीमा भागात शांतता राखण्यावर सहमती दर्शवली आणि शांतता करारावर स्वाक्षरी केली. ही बैठक भारत-चीन संबंध पुन्हा पटरीवर आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात होती.
सीमा वादावर तोडगा
यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये बीजिंग येथे वरिष्ठ प्रतिनिधी स्तरावरील (SR) बैठक पार पडली. या बैठकीत देखील भारत आणि चीनमधील सीमा विवादाशी संबंधित सहा मुद्द्यांवर सहमती झाली. दोन्ही देशांनी सीमा भागात शांतता राखण्यावर आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर दिला होता. गेल्या दोन वर्षापासून चीनचे सकारात्मक दृष्टीकोनामुळे चीन आणि भारत संबंध सुधारतील अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
व्यापार आणि संपर्क क्षेत्रात प्रगती
नोव्हेंबर 2024 पर्यंत भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराचा एकूण आकडा 126.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला असून यामध्ये 1.9% वार्षिक वाढ नोंदवली गेली. हे वाढते आर्थिक सहकार्य दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांचे निदर्शक आहे. याशिवाय, 2024 मध्ये चीनने 2,80,000 भारतीय नागरिकांना व्हिसा प्रदान केला. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील जनसंपर्क अधिक दृढ होत असल्याचे दिसून येते. 2025 हे वर्ष भारत आणि चीन यांच्यातील राजनयिक संबंधांचे 75 वे वर्ष असेल. वांग ली यांनी या निमित्ताने दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न होण्याची आशा व्यक्त केली आहे.
Win-Win धोरणावर भर
वांग ली यांनी चीन भारतासोबत ‘Win-Win’ धोरणांतर्गत काम करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी असेही म्हटले की, सीमा विवादावर योग्य तोडगा काढत दोन्ही देशांनी विकास आणि सहकार्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्यांनी सीमा भागात शांतता राखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारत आणि चीनमधील सहकार्य शांतता, व्यापार, आणि मैत्रीला नवी दिशा देऊ शकते. वांग ली यांनी व्यक्त केलेल्या विचारांनुसार, दोन्ही देश मैत्रीचा एक नवीन अध्याय लिहू शकतात. त्यामुळे हे विधान भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल ठरू शकते.