China sends 1000 tons of sodium perchlorate to Iran Israel fears Middle East turmoil
China-Iran/Missiles: इस्रायलशी झालेल्या संघर्षानंतर इराणने पुन्हा एकदा शस्त्रसाठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी चीनकडून इराणला मोठी मदत मिळत आहे. चीनने इराणला 1,000 टन सोडियम परक्लोरेट पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा वापर क्षेपणास्त्रांमध्ये इंधन तयार करण्यासाठी केला जातो. या मदतीने इराणला त्यांचा शस्त्रसाठा वाढवण्याची मोठी संधी मिळणार आहे.
चीनकडून मोठा रसायनसाठा इराणला पाठवण्याचे प्रयत्न
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, चीन 1,000 टन सोडियम परक्लोरेट इराणला पुरवणार आहे. या रसायनाचा उपयोग अमोनियम परक्लोरेट तयार करण्यासाठी होतो, जे क्षेपणास्त्र इंधनासाठी अत्यावश्यक आहे. 2023 मध्ये इस्रायलने इराणच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रांवर हल्ला करून त्यांची मोठी हानी केली होती. त्यामुळे इराणला शस्त्र उत्पादनाच्या क्षेत्रात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
सध्या, चीनने रसायनांनी भरलेले 34 कंटेनर इराणला पाठवण्याची तयारी केली आहे. हे कंटेनर चीनच्या दैशान बेटावरून मंगळवारी रवाना झाले असून, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडे (IRGC) पोहोचवले जाणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या बर्थराईट सिटीझनशिप कायद्याला घाबरले अमेरिकन; वेळेपूर्वीच बाळंतपण करण्यासाठी शर्यत
250 क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता
फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, 1,000 टन सोडियम परक्लोरेटपासून सुमारे 960 टन अमोनियम परक्लोरेट तयार होऊ शकते. क्षेपणास्त्र इंधनात सुमारे 70% अमोनियम परक्लोरेटचा वापर होतो. याचा अर्थ एवढ्या मोठ्या साठ्यातून इराण 250 खैबर शेकान किंवा हज कासम यांसारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करू शकते.
अमेरिकेचे निर्बंध आणि इराण-चीन संबंधांची नवी समीकरणे
2023 मध्ये अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मदत करणाऱ्या चीन, हाँगकाँग आणि इराणमधील व्यक्ती व संस्थांवर निर्बंध लादले होते. या निर्बंधांनुसार, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादनासाठी महत्त्वाचे घटक आणि तंत्रज्ञान पुरवणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच, इराणच्या ड्रोन कार्यक्रमाला मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली होती.
तथापि, चीन आणि इराण यांच्यातील सहकार्यामुळे अमेरिका आणि पश्चिमी देशांसाठी एक नवीन आव्हान निर्माण होऊ शकते. इराणच्या शस्त्रसाठ्याचा वापर केवळ राष्ट्रीय संरक्षणासाठीच नाही, तर ते इस्रायलसह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अफगाणिस्तानात पुन्हा वाढली इस्लामिक स्टेटची दहशत; चीनचा नागरिक ठार, देश हादरला
शस्त्रसाठ्याच्या वाढीमागील रणनीती
इराण-चीन सहकार्य केवळ लष्करी मदतीपुरते मर्यादित नसून, त्यामागे अमेरिका आणि इस्रायलच्या प्रभावाला आव्हान देण्याचे धोरण दिसते. चीनच्या मदतीमुळे इराणला स्वतःचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अधिक मजबूत करता येईल. इस्रायलच्या नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमुळे इराणला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. यामुळेच इराणने शस्त्रसाठा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
इराणच्या शस्त्र उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार
इराण-चीन युतीमुळे पश्चिमी देशांच्या गुप्तचर यंत्रणांना नवे आव्हान उभे राहिले आहे. चीनकडून मिळणाऱ्या सोडियम परक्लोरेटच्या मोठ्या साठ्यामुळे इराणच्या शस्त्र उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. या सहकार्याचा परिणाम केवळ स्थानिक संघर्षांपुरता मर्यादित राहणार नसून, जागतिक स्थैर्यासाठीही ते एक महत्त्वाचे आव्हान ठरू शकते. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतरही इराणच्या शस्त्रसाठ्याच्या वाढीला चीनकडून मिळणारी मदत, जागतिक राजकारणातील नवी समीकरणे निर्माण करत आहे.