china victory day parade world leaders attend modi focuses diplomacy
China Victory Day 2025 : बीजिंगमध्ये झालेल्या भव्य लष्करी परेडकडे जगाचे लक्ष वेधले गेले. चीनने विजय दिनाच्या निमित्ताने आपल्या सैन्याची ताकद दाखवत प्रचंड शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, उत्तर कोरियाचे किम जोंग उन, तसेच पाकिस्तान, नेपाळ, मालदीव, इराण, मलेशिया, म्यानमार, मंगोलिया आदी देशांचे नेते उपस्थित होते. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली.
मोदी नुकतेच दोन दिवसांपूर्वीच एससीओ शिखर परिषदेसाठी बीजिंगला गेले होते. जिनपिंग यांच्याशी त्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्याचे संकेत मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तरीसुद्धा मोदींनी चीनच्या परेडला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळेअभावी घेतलेला नाही, तर त्यामागे एक सखोल राजनैतिक रणनीती दडलेली आहे.
२०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेने भारताच्या जनमानसात खोलवर जखम निर्माण केली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या परेडला उपस्थित राहणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या त्यांना मान्यता देणे, असे भारताला वाटले असते. म्हणूनच मोदींनी परेडपासून अंतर ठेवणे पसंत केले. हे पाऊल म्हणजे “राष्ट्रीय सुरक्षेला प्रथम प्राधान्य” असा स्पष्ट संदेश आहे.
हे देखील वाचा : पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?
भारताचा शेजारी पाकिस्तान आजही चीनच्या राजकीय व सामरिक पाठिंब्यावर उभा आहे. बीजिंगच्या परेडमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व उपस्थित असताना मोदी गैरहजर राहिले. यामध्येही एक राजनैतिक संदेश दडलेला आहे भारत कधीही अशा मंचाचा भाग होणार नाही जिथे त्याच्या प्रमुख शत्रूला उघड पाठिंबा मिळतो.
या परेडचे आयोजन दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या औपचारिक आत्मसमर्पणाच्या स्मरणार्थ करण्यात आले होते. चीनने जपानविरुद्धची ऐतिहासिक आठवण जागवली असली तरी, भारतासाठी जपान हा महत्त्वाचा आर्थिक आणि सामरिक भागीदार आहे. जर मोदी परेडमध्ये गेले असते, तर टोकियोला चुकीचा संदेश गेला असता. म्हणूनच भारताने जपानला दुखावणे टाळले.
मोदींच्या या निर्णयामुळे भारताने एक गोष्ट स्पष्ट केली आहे बहुपक्षीय व्यासपीठांवर चीनशी चर्चा सुरू ठेवण्यात काही हरकत नाही, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर भारत कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाही. परेडला गैरहजर राहून मोदींनी जगाला दाखवून दिले की राजनैतिक संवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा हे दोन वेगळे आयाम आहेत.
सीएनएनच्या अहवालानुसार, मोदींचा निर्णय हा विचारपूर्वक आखलेला राजनैतिक डाव आहे. त्यांनी चीनलाच नव्हे तर जगालाही संदेश दिला – “भारत संवादाला तयार आहे, पण आपल्या सीमारेषांवरील वास्तवाकडे डोळेझाक करणार नाही.” भारताचा हा ठाम दृष्टिकोन म्हणजे केवळ चीनलाच नव्हे, तर पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांनाही अप्रत्यक्ष इशारा आहे. जपानसारख्या भागीदार देशांना दिलेली सकारात्मक भूमिका भारताच्या राजनैतिक परिपक्वतेचे उदाहरण आहे.
हे देखील वाचा : विज्ञानाचा अद्भुत चमत्कार! लाल नाही तर निळे रक्त असलेले ‘हे’ जलचर अत्यंत दुर्मिळ आणि महागडे
नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीमुळे चीनच्या परेडला झाकोळणारा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. मात्र या निर्णयाने भारताने जगाला दाखवून दिले की राजनैतिक रणनीती केवळ फोटोसेशन किंवा औपचारिकतेसाठी नसते, तर त्यात देशाच्या सुरक्षेची, सामरिक भागीदारीची आणि शेजारी संबंधांची काटेकोर गणिते दडलेली असतात.