Chinese scientists used BSI technology to help a paralyzed patient walk again
शांघाय – वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होत आहेत. चिनी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ब्रेन-स्पाइन इंटरफेस (BSI) तंत्रज्ञानाच्या मदतीने एक अभूतपूर्व वैद्यकीय चमत्कार घडवला आहे. पूर्णतः अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला पुन्हा चालण्यास सक्षम बनवणारे हे तंत्रज्ञान लाखो रुग्णांसाठी आशेचा नवा किरण ठरू शकतो.
अर्धांगवायूमुळे मर्यादित जीवन… आणि अचानक चमत्कार!
अर्धांगवायूमुळे पाय हलवण्याची क्षमता पूर्णतः गमावलेले अनेक रुग्ण असतात. अशा परिस्थितीत पुन्हा उभे राहणे आणि चालणे अशक्यप्राय मानले जाते. मात्र, शांघायच्या झोंगशान रुग्णालयात बीएसआय तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या एका शस्त्रक्रियेमुळे हे अशक्य कार्य शक्य झाले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ २४ तासांत रुग्णाने आपल्या पायावर उभे राहून चालण्यास सुरुवात केली.
बीएसआय तंत्रज्ञान कसे कार्य करते?
हे तंत्रज्ञान मेंदू आणि पाठीचा कणा यांच्यात तुटलेला संपर्क पुनर्स्थापित करण्यासाठी “न्यूरल ब्रिज” तयार करते. जेव्हा पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत होते, तेव्हा मेंदू आणि स्नायूंमधील सिग्नल प्रवाह थांबतो, परिणामी रुग्ण आपले हात-पाय हलवू शकत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऑस्ट्रेलियात सर्वात भीषण चक्रीवादळ ‘अल्फ्रेड’चा कहर; 40 लाख लोक धोक्यात, लॉकडाउन सारखी स्थिती
BSI तंत्रज्ञानामध्ये –
मेंदूतील सिग्नल गोळा करून ते डीकोड केले जातात.
अत्यंत सूक्ष्म मायक्रो-इलेक्ट्रोड चिप्स (केवळ 1 मिमी आकाराच्या) मेंदूच्या मोटर कॉर्टेक्समध्ये रोपण केल्या जातात.
विद्युत शॉकच्या साहाय्याने पाठीचा कणा सक्रिय करून मेंदूपासून शरीरापर्यंत तुटलेली लिंक पुन्हा जोडली जाते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शरीर मेंदूचे सिग्नल त्वरित वाचून प्रतिसाद देते.
फक्त 4 तासांची शस्त्रक्रिया, 24 तासांत आश्चर्यकारक परिणाम!
या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना करण्यात आलेली शस्त्रक्रिया फक्त 4 तासांत पूर्ण झाली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर केवळ २४ तासांत रुग्णाने आपल्या पायांचे हालचाल सुरू केली आणि काही दिवसांत तो चालण्यास सक्षम झाला. या तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या फुदान विद्यापीठ आणि झोंगशान हॉस्पिटलच्या शास्त्रज्ञांनी गेली तीन वर्षे अथक परिश्रम घेत एक अत्याधुनिक अल्गोरिदम विकसित केला. हा अल्गोरिदम मेंदूतील सिग्नल त्वरित ओळखून शरीराला प्रतिसाद देण्यास मदत करतो.
तीन रुग्णांवर आधीच यशस्वी प्रयोग
या शस्त्रक्रियेपूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये अशाच प्रकारच्या तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यातही यश मिळाले, पण हा नवा प्रयोग अधिक प्रभावी ठरला आहे. दोन आठवड्यांत रुग्ण चालू शकला, हे विशेष आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेसोबत वाढत्या तणावादरम्यान चीनचा मोठा निर्णय! ‘ड्रॅगन’च्या नव्या योजनेमुळे भारतासमोरही मोठे आव्हान
पक्षाघातग्रस्त रुग्णांसाठी नव्या आशेचा किरण
बीएसआय तंत्रज्ञानामुळे लाखो पक्षाघातग्रस्त रुग्णांना नवे जीवन मिळू शकते. या संशोधनात सहभागी असलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जिया फुमिन म्हणतात, “या तंत्रज्ञानाचे परिणाम आमच्या अपेक्षेपेक्षा चांगले होते. हा केवळ वैद्यकीय यशाचा विजय नसून, अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात आहे.” शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात या तंत्रज्ञानात आणखी सुधारणा करण्यात येणार असून, त्याचा अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विज्ञानाच्या संगमामुळे आता अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागल्या आहेत. बीएसआय तंत्रज्ञानाचे हे यश वैद्यकीय क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.