नवी दिल्ली- अफ्रिकी देश असलेल्या सुदानमध्ये (Sudan) सध्या अंतर्गत बंडाळी माजलेली आहे. देशात सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये सत्ता कुणी ताब्यात घ्यायची, यावरुन संघर्ष सुरु आहे. देशात सुरु असलेल्या या गृहयुद्धात आत्तापर्यंत 400 हून अधिक जण मारले गेले आहेत. तर 4000 च्या घरात नागरिक जखमी झालेले आहेत. या सगळ्यात 72 तासांची शस्त्रसंधी जाहीर करण्यात आलीय. अमेरिका आणि सौदी अरब या देशांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आलीय. यानंतर अफ्रिकेत अडकून पडलेल्या भारतीयांना तिथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत. यासाठी केंद्र सरकारनं ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरु केलेलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंद बागची यांनी सांगितलंय की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा देशात परत आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरु करण्यात आलेलं आहे. पहिल्या पळीत 278 भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची आयएनएस सुमेधा पोर्ट सुदानवरुन जेद्दासाठी निघालेली आहे. सुदानमध्ये गेल्या 10 दिवसांसाठी हे गृहयुद्ध सुरु आहे.
भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर सुदान उप सहारा अफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या सीमेवर स्थित आहे. सुदानच्या उत्तरेला लिबिया आणि रोम, पश्चिमेला चाड असे देश आहेत. सात देशांना लागून सुदानची सीमा आहे. सुदान अफ्रिकी आणि अरबी देश आहे. अरबी ही देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. या देशात 97 टक्के लोकसंख्या ही सुन्नी मुसलमानांची आहे. देशात मुसलमानांचं वर्चस्व आहे.
सुदानमध्ये बोलण्यात येणाऱ्या 1000 भाषांत, सर्वाधिक भाषा या स्वदेशी आहेत. त्यात न्युबियन, ता बेदावी, नीलोटिक आणि निलो-हैमेटिक यांचा समावेश आहे. अरबी ही भाषा सर्वाधिक लोकं बोलतात. यासह काही जण इंग्रजी बोलतात.
सुदानमधील एक तृतियांश लोकसंख्या ही शहरांत राहते. उर्वरित 70 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. सुदानमधील प्रमुख शहरं ही नील नदी आमि रेड सीच्या किनाऱ्यांवर वसलेली आहेत. ओमडुरमैन हे दाशीतल सर्वात मोठं शहर आहे. दुसरा नंबर खर्तूम या शहराचा आहे.