Corona-like MERS virus found in China
बीजिंग : चीनमध्ये कोरोनासारखा आणखी एक नवीन विषाणू आढळून आला असून, यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वुहानमधील प्रयोगशाळेत संशोधकांना हा विषाणू आढळला असून, तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरण्याची क्षमता बाळगतो. या नव्या विषाणूचा शोध लागताच वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
वुहान प्रयोगशाळेत नवीन विषाणूचा शोध
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी या नवीन विषाणूचा शोध लावला आहे. हा विषाणू मानवी पेशींमध्ये त्याच पद्धतीने प्रवेश करतो जसा कोरोना विषाणू करत होता. या विषाणूला ‘मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ (MERS) म्हणून ओळखले जाते, जो मानवासह इतर सस्तन प्राण्यांच्या शरीरात आढळणाऱ्या विशिष्ट प्रथिनांना बांधून पेशींना संक्रमित करतो.
संशोधकांच्या मते, हा विषाणू अत्यंत धोकादायक ठरू शकतो, कारण यामुळे श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, हा विषाणू प्राण्यांपासून माणसामध्ये सहज पसरण्याची क्षमता बाळगतो, ज्यामुळे भविष्यात आणखी एका महामारीचा धोका निर्माण होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Defense Power: चीनच्या आण्विक, जैविक आणि रासायनिक संरक्षण कवायतींनी निर्माण केली जागतिक खळबळ
MERS विषाणूची वाढती संख्या, धोक्याचा इशारा
2012 पासून आतापर्यंत सुमारे 2600 लोकांमध्ये MERS विषाणूची पुष्टी झाली असून, या संसर्गामुळे आतापर्यंत 36% लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, सौदी अरेबियामध्ये या विषाणूची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
वुहान व्हायरस रिसर्च सेंटर हे पूर्वी वटवाघुळांमध्ये आढळलेल्या कोरोनाव्हायरसच्या संशोधनासाठी ओळखले जाते. त्यामुळे हा नवीन विषाणू देखील प्रयोगशाळेतील अभ्यासाचा भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याच्या प्रसाराची शक्यता आणि परिणामकारकता यावर अद्याप ठोस निष्कर्ष काढलेले नाहीत.
कोरोना महामारीचा आठवण करून देणारा धोका
कोरोनाने संपूर्ण जगावर कहर केला होता. 2019 मध्ये वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू गळती झाल्याचा संशय अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर संपूर्ण जगाला कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. लाखो लोकांचा मृत्यू झाला, अर्थव्यवस्था कोलमडली आणि जगभर लॉकडाऊन लागू करण्यात आले.
WHO च्या अहवालानुसार, कोविडमुळे जगभरात 1.5 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. भारतातही कोरोनाचा मोठा फटका बसला. WHO च्या अहवालानुसार, भारतात कोविडमुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, मात्र भारत सरकारने हा आकडा नाकारत 4.8 लाख मृत्यू झाल्याचा दावा केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Thinking Day 2025: हा विशेष दिवस “आपले जग, आपले भविष्य” या थीमसह साजरा केला जात आहे, जाणून घ्या महत्त्व
नवीन विषाणूपासून सावधगिरीची गरज
कोरोनाच्या भीषण महामारीनंतर, जगभरातील देश आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क झाले आहेत. चीनमध्ये आढळलेला हा नवीन विषाणू किती घातक आहे आणि तो भविष्यात महामारीसारखा पसरू शकतो का, यावर अजून संशोधन सुरू आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि विविध देशांच्या वैज्ञानिक संस्थांनी या विषाणूच्या अभ्यासाला गती दिली आहे. भविष्यात याचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नवनवीन उपाययोजना आखण्याची गरज भासणार आहे.