World Thinking Day 2025: हा विशेष दिवस “आपले जग, आपले भविष्य” या थीमसह साजरा केला जात आहे, जाणून घ्या महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली: जागतिक बंधुता आणि ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २२ फेब्रुवारी रोजी जागतिक विचार दिन साजरा केला जातो. स्काउट्स आणि गाईड्स या संस्थांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या दिवसाचा मुख्य उद्देश तरुणांना समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना सामाजिक तसेच जागतिक समस्यांबाबत जागरूक करणे हा आहे.
जागतिक विचार दिनाचा इतिहास
हा विशेष दिवस १९२६ साली सुरू झाला. स्काउट्स आणि गाईड्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या दिवसाची संकल्पना मांडण्यात आली आणि त्यानुसार लंडनमध्ये प्रथमच जागतिक विचार दिन साजरा करण्यात आला. हा दिवस केवळ विचार करण्यापुरता मर्यादित नसून, तरुणांना त्यांच्या हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी तो दरवर्षी विविध उपक्रमांसह साजरा केला जातो.
2025 ची थीम: “आपले जग, आपले भविष्य”
यंदा जागतिक विचार दिन २०२५ ची थीम “आपले जग, आपले भविष्य” अशी आहे. ही थीम तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी जबाबदारीने विचार करण्यास आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्यास प्रेरित करते. जगातील तरुणांनी पर्यावरण, शिक्षण, लैंगिक समानता आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे, हा या संकल्पनेचा गाभा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lunar Eclipse 2025 : ‘या’ तारखेला दिसणार यंदाचा पहिला Blood Moon, वाचा काय आहे खास?
तरुणांसाठी जागरूकतेचे महत्व
देशाचा खरा विकास हा तरुणांच्या विचारांवर अवलंबून असतो. एक सकारात्मक विचारसरणी संपूर्ण समाजाचा विकास घडवू शकते. त्यामुळेच स्काउट्स आणि गाईड्स या संस्थांनी हा दिवस तरुणांच्या जागृतीसाठी निवडला आहे. या निमित्ताने विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमार्फत चर्चासत्रे, कार्यशाळा आणि समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात.
समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे उद्दीष्ट
चांगले विचार जीवन बदलू शकतात. जर एखादी व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजहितासाठी कार्यरत झाली, तर समाजात मोठा बदल घडू शकतो. म्हणूनच, या दिनाच्या निमित्ताने तरुणांनी पुढाकार घेऊन सामाजिक विषयांवर चर्चा करावी आणि ठोस पावले उचलावीत.
जागतिक विचार दिनाचे महत्त्व
हा दिवस फक्त विचार करण्याचा नाही, तर कृतीतून समाजासाठी काहीतरी करण्याचा आहे. आपल्या जगाला चांगले बनवण्यासाठी आपले विचार आणि कृती सकारात्मक असणे आवश्यक आहे. एक चांगला विचार, योग्य दिशा आणि सामूहिक प्रयत्न यांच्या साहाय्यानेच समाज आणि देश उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हेच जगाच्या विनाशाचे संकेत? समुद्रातून वेदनेने तडफडत बाहेर आली दुर्मिळ डूम्सडे फिश, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
“आपले जग, आपले भविष्य”
जागतिक विचार दिनाच्या निमित्ताने आपण समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “आपले जग, आपले भविष्य” ही थीम आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारी आहे. त्यामुळे हा दिवस केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, समाजातील सकारात्मक बदलांसाठी योगदान द्यावे, हाच या दिवसाचा खरा संदेश आहे!