बांगलादेशनंतर आता नेपाळमध्ये होणार सत्तापालट! आंदोलकांच्या काय आहेत मागण्या? (फोटो सौजन्य-X)
Nepal Bans Social Media platforms : नेपाळमध्ये जेन झीचं हे आंदोलन सुरु आहे. नेपाळ सरकारने 26 सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतला आणि नेपाळमध्ये जेन झी पिढी रस्त्यावर निदर्शनासाठी उतरली. याचदरम्यान आता नेपाळमध्ये बांगलादेशसारखे सत्तापालट होण्याची शक्यता आहे, जिथे जनता रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांच्या ५ मुख्य मागण्या समोर आल्या आहेत. पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा द्यावा आणि लवकरच निवडणुका घ्याव्यात अशी यावेळी आंदोलकांनी मागण्या व्यक्त केल्या आहेत. एकीकडे जनतेची नाराजी वाढत आहे आणि नेपाळमध्ये राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे.
सरकारविरुद्ध निदर्शने करणाऱ्या तरुणाचं म्हणण आहे की, पंतप्रधान ओली सरकारचा काळ संपला आहे. आता आम्हाला तुमचे नेतृत्व नको आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिल्याने तुम्ही नेते झालात, पण तुम्ही आमच्या मुलांना मारले. आता आम्ही ती सत्ता परत घेत आहोत. आम्हाला तुम्ही आणि तुमचे सरकार नको आहे.
संसद बरखास्त करावी.
सर्व खासदारांनी राजीनामा द्यावा.
आंदोलकांवर गोळ्या घालण्याचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.
आमच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले पाहिजे.
अंतरिम सरकारच्या अंतर्गत लवकरच निवडणुका झाल्या पाहिजेत.
आम्ही आमच्या मतांनी तुम्हाला पराभूत करू
सरकारविरुद्धच्या सार्वजनिक मागण्यांचे एक पोस्टर व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, संसदेने लोकांचा विश्वास गमावला आहे, आता तो आमचा आवाज नाही. ८ सप्टेंबर रोजी, प्रत्येक जीवासाठी, प्रत्येक हिरावलेल्या आशेसाठी, आम्ही आमचा आवाज उठवू. आम्ही अधिक मजबूत होऊ. तुम्ही लोकशाहीचे वचन दिले, पण भ्रष्टाचार आणि हुकूमशाही दिली. तुम्ही प्रत्येक बंड दडपत राहिलात, पण आता हे चक्र संपेल. यावेळी आम्ही आमच्या मतांनी तुम्हाला पराभूत करू.
नेपाळमधील तरुण भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीबद्दल संतप्त आहेत. सोमवारी हजारो तरुणांनी सोशल मीडियावरील बंदीचा निषेध केला. हिंसक निषेधात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने बंदी उठवली आहे, परंतु पंतप्रधान केपी ओली राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सरकारने तरुणांना निषेध मागे घेण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, काठमांडूमध्ये तरुण आणि सामान्य नागरिक पुन्हा संसदेबाहेर जमत आहेत. त्यांनी आज निषेध तीव्र करण्याबद्दल बोलले आहे.