Death toll in Gaza without food and water rises to over 800 hopes of ceasefire dim
Gaza crisis 2025 : गाझा पट्टीतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथील लाखो नागरिक अन्न, पाणी आणि औषधांच्या तुटवड्यामुळे जीव मुठीत घेऊन जगत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या (OHCHR) ताज्या अहवालानुसार, मे महिन्याच्या अखेरीपासून ते ७ जुलैपर्यंत गाझामध्ये मदतीसाठी झगडताना ७९८ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या प्रत्येक क्षणाला वाढत आहे.
गाझामधील रफाह परिसरात शुक्रवारी (११ जुलै) किमान दहा पॅलेस्टिनी नागरिकांनी उपासमारीत प्राण गमावले. हे लोक राशनच्या एका ट्रकची वाट पाहत होते. आता गाझामध्ये अशा घटनांना दररोज सामोरे जावे लागत आहे. नागरी संरक्षण संस्थेच्या मते, अन्न आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे लोकांमध्ये थेट उपासमार दिसत आहे. ही एक भयानक आणि अश्रूजनक स्थिती आहे.
OHCHR च्या प्रवक्त्या रविना शामदासानी यांनी जिनेव्हामधील पत्रकार परिषदेत सांगितले की, “गाझामध्ये लोकांना दोनच पर्याय उरले आहेत गोळी खावी की अन्न.” अशा स्थितीत, ही एक मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले.
संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ६१५ जण ‘गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन’ (GHF) च्या मदत वितरण स्थळांजवळ मारले गेले. GHF ही अमेरिकेच्या व इस्रायलच्या पाठबळाने स्थापन झालेली संस्था असून, तिने संयुक्त राष्ट्रांच्या पारंपरिक मदत प्रणालीची जागा घेतली आहे. मात्र, याच संस्थेच्या उपस्थितीवर UN ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि सहकार्य करण्यास नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रांना शंका आहे की GHF चा वापर इस्रायली लष्करी हेतूसाठी केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दरवर्षी थोडं थोडं बुडतंय हे विमानतळ, पण जगातलं सर्वोत्तम! जपानचं कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ धोक्यात
या संपूर्ण घटनेनंतर इस्रायली सैन्याने स्पष्ट केले आहे की, ते नागरिकांच्या मृत्यूबाबत चौकशी करत आहे. मदत वितरण स्थळांजवळ अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सैनिकांना नवीन आदेशही दिले गेले आहेत. त्यांनी हेही सांगितले की, “मदत शोधणारे आणि सुरक्षा दल यांच्यातील संघर्ष कमी करणे ही आमची प्राथमिकता आहे.”
दुसरीकडे GHF ने संयुक्त राष्ट्रांच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. GHF च्या म्हणण्यानुसार, “UN च्या मदतीच्या काफिल्यांशी संबंधित हल्ले अधिक प्राणघातक ठरले आहेत.” त्यांनी UN च्या अहवालाला ‘खोटा आणि दिशाभूल करणारा’ ठरवले आहे.
गाझा आणि इस्रायलमधील युद्ध २२ व्या महिन्यात प्रवेश करत आहे. दरम्यान, कतारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून युद्धबंदीची आशा पुन्हा एकदा जागी झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ६० दिवसांची संभाव्य युद्धबंदी लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर कायमस्वरूपी शांती स्थापनेसाठी वाटाघाटी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचा वाढता धोका युरोपसाठी गंभीर! अमेरिकन जनरल म्हणाले NATOला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज
सध्या गाझामधील लाखो नागरिकांच्या जिवावर बेतलेली ही स्थिती जागतिक समुदायाला मोठा सवाल विचारत आहे – “मानवता कुठे आहे?” अन्न आणि पाण्यासारख्या प्राथमिक गरजांपासून वंचित राहून जीव गमावणाऱ्या पॅलेस्टिनी जनतेसाठी तातडीची आणि निर्बंधरहित मदत पोहोचवणे हेच आता सर्वांत मोठे ध्येय असायला हवे.