वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. आता अमेरिकेचे नवचर्चित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्या प्रशासनासाठी नवीन टीम बांधण्यात व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी माईक वाल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. यामुळे भारताच्या हितासाठी सकारात्मक पाऊल उचलेले गेले आहे. माईक वाल्टझ हे निवृत्त नॅशनलल गार्ड अधिकारी असून, अफगाणिस्तानातील युद्धात त्यांनी भाग घेतला होता.
चीनविरोधी भूमिकेमुळे माईक वॉल्ट्झ भारतासाठी महत्वाचे मानले जातात
माईक वॉल्ट्झ यांच्या चीनविरोधी भूमिकेमुळे ते भारतासाठी महत्त्वाचे मानले जातात. कारण भारत-चीन संबंधावर याचा प्रभाव पडू शकतो. वॉल्टझ हे रिपब्लिकन पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी अमेरिका-भारत संबंध सुधारण्याच्या उद्दिष्टाने स्थापन केलेल्या “इंडिया कॉकस” संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंडिया कॉकस ही अमेरिकेतील एक द्विपक्षीय संघटना आहे. ही संघटना भारतीय-अमेरिकन समुदायाशी संबंध दृढ करण्यास मदत करते. यामुळे वॉल्ट्झ हे भारताचे हित जपणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व मानले जातात. यामुळे त्यांची NSA म्हणून निवड भारतासाठी सकारात्मक ठरू शकते असे म्हटले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात भारतासाठी मोठा आधार: माईक वॉल्ट्झ यांची NSA पदावर नियुक्ती(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो?
माईक वॉल्ट्झ अनेक प्रसंगी चीनविरोधी वक्तव्ये करत आले आहेत. त्यांनी चीनमधील कोविड-19 च्या उत्पत्तीपासून ते उईघुर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांवर कठोर भाष्य केले आहे. त्यांच्याच मागणीवर अमेरिकेने 2022 हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. रिपब्लिकन पक्षाच्या “चायना टास्क फोर्स”मध्ये वॉल्ट्झचा समावेश असल्यामुळे ते आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हानांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे समर्थक आहेत. या दृष्टिकोनामुळे चीनच्या आक्रमक धोरणांना आव्हान दिले जाऊ शकते. यामुळे भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो.
ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या
याशिवाय, ट्रम्प यांनी इतर महत्त्वपूर्ण पदांसाठीही काही नियुक्त्या केल्या आहेत. स्टीफन मिलर यांना धोरणात्मक प्रकरणांचे उपप्रमुख म्हणून निवडले आहे. तसेच टॉम होमन यांना “बॉर्डर झार” म्हणून नियुक्त केले आहे. होमन यांच्यावर बेकायदेशीर परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची जबाबदारी असणार आहे. ही जबाबदारी ट्रम्प यांच्या अजेंड्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, वॉल्ट्झ यांची NSA म्हणून निवड आणि इतर नियुक्त्यांमुळे ट्रम्प प्रशासन भारताच्या हिताच्या दृष्टीने मजबूत भूमिका घेऊ शकते अस तज्ञांचे म्हणणे आहे. चीनविरोधी भूमिका अधिक तीव्र करण्याचा त्यांचा मानस असल्याने भारतासाठी हे सकारात्मक ठरू शकते.