
चीनच्या क्षेपणास्त्रांनी पाडले होते अमेरिकेचे 'ते' विमान; उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून ड्रॅगनची तेहरानला मदत
बीजिंग : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात चीनच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एका अमेरिकी माध्यमाच्या वृत्तानुसार, युद्धात पाडण्यात आलेले अमेरिकी एफ-15 ई विमान एका चिनी क्षेपणास्त्राने पाडले होते. एप्रिलमध्ये घडलेल्या या घटनेने जगभरात लक्ष वेधून घेतले होते. एफ-१५ ई विमान पाडण्यासाठी चिनी बनावटीच्या खांद्यावरून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मात्र, हे क्षेपणास्त्र अलीकडेच इराणला पुरवण्यात आले होते की, ते इराणच्या जुन्या लष्करी साठ्याचा भाग होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या संपूर्ण घटनेची सुरुवात यावर्षी एप्रिलमध्ये झाली. नैऋत्य इराणवर अमेरिकेचे एक एफ-१५ ई स्ट्राईक ईगल लढाऊ विमान पाडण्यात आले. अनेक दशकांत प्रथमच शत्रूच्या गोळीबारात अमेरिकेचे लढाऊ विमान पाडण्यात आले होते. हल्ल्यादरम्यान दोन्ही वैमानिक इराणवर सुरक्षितपणे बाहेर पडले. पेंटागॉनने या घटनेचा संपूर्ण वृत्तांत प्रसिद्ध केला. पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, वैमानिकाची सात तासांच्या आत सुटका करण्यात आली, तर शस्त्रप्रणाली अधिकारी झाग्रोस पर्वताच्या पायथ्याशी लपून बसला होता. दोन दिवसांनंतर त्याला शोधून त्याची सुटका करण्यात आली.
लष्करी निर्यातीसंदर्भात चीन आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नेहमीच जबाबदारीने वागतो. या घटनेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये नवीन तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनवर उपग्रह सेवा आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे इराणचे सैन्य मजबूत केल्याचा आरोप केला आहे. तज्ज्ञ आणि स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेनुसार, २००६ मध्ये इराणवर संयुक्त राष्ट्रांनी शस्त्रबंदी लादल्यानंतर, चीनने मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्री कमी केली. यानंतर, इराणने आपला देशांतर्गत शस्त्र उत्पादन उद्योग विस्तारला. अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही चीनने इराणला आर्थिक मदत सुरूच ठेवली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिले होते संकेत
या घटनेनंतर लगेचच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, खांद्यावरून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राने विमानाला लक्ष्य करण्यात आले होते. अमेरिकन अधिकारी या विमान पाडण्याच्या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत. तथापि, अमेरिकन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, या चिनी मदतीचा रणांगणावर निर्णायक परिणाम झाला नाही. संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकन आणि इराणी अधिकारी सध्या वाटाघाटी करत आहेत. या महिन्यात अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत युद्धविराम घडवून आणला होता.