Druze A secretive 8-lakh community stuck between Israel-Syria conflict neither Muslim nor Christian
Druze community : मध्य पूर्वेतील राजकारण सतत उलथापालथीचं मैदान ठरत असताना एक समुदाय पुन्हा चर्चेत आला आहे. ड्रुझ. ना मुस्लिम, ना ख्रिश्चन, ना ज्यू… तरीही धर्म, इतिहास आणि राजकीय स्थैर्य यांचं अनोखं मिश्रण असलेला हा समुदाय आजही अनेकांसाठी एक कोडंच आहे. सध्या सीरियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ड्रुझ समुदाय केंद्रस्थानी आला असून, त्यांच्या अस्तित्वासाठीच लढा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.
ड्रुझ हे वांशिकदृष्ट्या अरब असूनही त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे ते कोणत्याही प्रमुख धर्मात बसत नाहीत. त्यांचा धर्म ११व्या शतकात फातिमी खलीफा अल-हकीम द्वि-अम्र अल्लाहच्या कारकिर्दीत निर्माण झाला. त्यांनी इस्लामच्या इस्माईली शाखेतून बाहेर पडत एक स्वतंत्र धार्मिक विचारसरणी तयार केली. त्यांच्या धर्मातील अनेक गोष्टी गुप्त आहेत, अगदी त्यांचा धार्मिक ग्रंथसुद्धा सार्वजनिक नाही. ड्रुझ कुराण व इस्लामिक तत्त्वांचा आदर करतात, पण पारंपरिक इस्लामिक कर्तव्यं जसं की नमाज, रोजा, हज आदी ते पाळत नाहीत. त्यामुळेच इस्लाममधील अनेक लोक त्यांना ‘मुस्लिम’ मानत नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एका भाजी विक्रेत्याच्या मारहाणीने पेटले Israel-Syria War! 300 मृत्यूंच्या घटनेमागे लपलेली खरी कहाणी
गेल्या काही दिवसांत सीरियाच्या स्वेदा शहरात ड्रुझ आणि बेनेदोई समुदायांमध्ये संघर्ष उफाळला. यात तब्बल ३५० हून अधिक ड्रुझ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. परिणामी, सीमेवरील वातावरण तणावपूर्ण झालं आणि इस्रायलनेही सीरियावर जोरदार हल्ले सुरू केले. या कारवाईत दमास्कस आणि इतर शहरांतील लष्करी ठिकाणं, संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयावर हल्ले करण्यात आले, ज्यात अनेक कर्मचारी ठार झाले.
आज ड्रुझ समुदायाची प्रमुख वस्ती सीरिया, इस्रायल, लेबनॉन आणि जॉर्डनमध्ये आहे.
सीरियामध्ये सुमारे ७ ते ८ लाख ड्रुझ नागरिक आहेत, जे देशाच्या लोकसंख्येच्या ३-४% इतके आहेत. त्यांची मुख्य वस्ती दक्षिण सीरियाच्या अस-सुवेदा प्रांतात आहे, ज्याला ‘ड्रुझचा पर्वत’ म्हणतात.
इस्रायलमध्ये सुमारे १.५ लाख ड्रुझ आहेत, जे गॅलीली, हैफा, कार्मेल हिल्स आणि गोलन हाइट्समध्ये राहतात. गोलन हाइट्स हे क्षेत्र पूर्वी सीरियाचं होतं, पण १९६७ च्या युद्धात इस्रायलने ते ताब्यात घेतलं.
ड्रुझ हे इस्रायलमधील एकमेव अरब भाषिक अल्पसंख्याक आहेत जे स्वेच्छेने इस्रायली सैन्यात सहभागी होतात. ते कर भरतात, मतदान करतात आणि अनेकजण सरकारी पदांवरही कार्यरत आहेत. त्यामुळे इस्रायलसाठी ते एक विश्वासू घटक ठरतात.
दुसरीकडे, इस्रायल ड्रुझ समुदायाला एक राजकीय लाभदायक घटक म्हणून पाहतो. सीरियासारख्या अस्थिर शेजारी राष्ट्रात जर ड्रुझ समाज संकटात सापडला, तर इस्रायल त्यांचं संरक्षण करण्याचा दावा करतो. हेच कारण आहे की स्वेदा शहरातील संघर्षानंतर इस्रायलने सीरियावर थेट हल्ले चढवले.
ड्रुझ समुदाय कुठेही राहो, ते स्थानिक सरकारशी सहकार्य राखतात. ते धार्मिक ओळख जपत असतानाही, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक एकतेवरही विश्वास ठेवतात. यामुळेच त्यांना मध्य पूर्वेतील राजकीय पटावरील ‘संतुलन राखणारा घटक’ मानलं जातं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Syria War : पुढची NEWS सांगायचीही संधी न देता, इस्रायलने केला थेट सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO
मध्य पूर्वेतील संघर्ष अनेकदा धर्माच्या नावावर उभा राहताना दिसतो. पण ड्रुझ समुदायाचं उदाहरण हे सांगतं की धार्मिक गूढता आणि राजकीय वास्तव यामध्ये एक अतिशय नाजूक रेषा आहे. सीरियामधील वर्तमान परिस्थिती आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे ड्रुझ पुन्हा चर्चेत आले आहेत. पण खरं प्रश्न आहे या समुदायाचं अस्तित्व केवळ राजकीय वापरापुरतंच मर्यादित राहणार का, की त्यांची स्वतंत्र ओळख टिकवली जाणार?