earthquake in myanmar 15 times in 24 hours temples and bridgesdestroyed
नेपीडॉ : म्यानमारमध्ये निसर्गाने आपले रौद्ररूप दाखवले असून, गेल्या २४ तासांत तब्बल १५ वेळा भूकंपाचे हादरे बसले आहेत. या विनाशकारी आपत्तीमुळे संपूर्ण देश हादरला असून, १ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक इमारती, मंदिरे आणि पूल कोसळले असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. विशेष म्हणजे, भूकंपानंतर इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती बाहेर येऊ शकलेली नाही.
या भूकंपाने म्यानमार ते बँकॉकपर्यंत विध्वंस घडवला आहे. आधुनिक इमारती, हायटेक सुविधा आणि मजबूत पायाभूत संरचना यासमोरही निसर्गाच्या या तडाख्याने शरणागती पत्करली आहे. मात्र, धोका अजून टळलेला नाही. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या भूकंपामुळे निर्माण झालेली ऊर्जा अजूनही म्यानमारच्या जमिनीत सक्रिय आहे, त्यामुळे पुन्हा भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ‘हा’ मुलगा? ज्याने 3 आठवडे आधीच केली होती म्यानमारच्या भूकंपाची भविष्यवाणी
या भूकंपाचा प्रभाव इतका तीव्र होता की १९३४ मध्ये बांधलेला ऐतिहासिक अवा ब्रिज पूर्णपणे कोसळला. हा पूल म्यानमारच्या सांस्कृतिक आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना मानला जात होता. स्थानिकांसाठी हा केवळ पूल नव्हता, तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. मात्र, स्फोटक भूकंपीय लहरींमुळे हा ऐतिहासिक पूल मातीमोल झाला.
म्यानमारमध्ये पॅगोडा मंदिराचाही नाश झाला आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट होते, आणि दरवर्षी येथे लाखो पर्यटक आणि भाविक येत असत. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी मंदिराची संरचना जमीनदोस्त झाली आणि आता तिथे केवळ विध्वंसाचे भयावह दृश्य दिसत आहे. स्थानिकांसाठी हे मंदिर आस्था आणि इतिहासाचे प्रतीक होते, मात्र निसर्गाच्या तडाख्यासमोर तेही टिकू शकले नाही.
म्यानमार सध्या गृहयुद्धाच्या संकटात सापडले आहे, आणि त्यातच ही नैसर्गिक आपत्ती म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यांगूनला मदत सामग्री पोहोचवली आहे. यात अन्नधान्य, औषधे आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.
भारत यापूर्वीही अशा आपत्तींच्या वेळी वेगवेगळ्या देशांना मदतीचा हात दिला आहे. नैसर्गिक आपत्ती असो की मानवी संकट, भारत हमीने संकटग्रस्त देशांना मदत करत आला आहे. म्यानमारसाठीही ही मदत संजीवनी ठरणार असून, येत्या काळात भारताकडून आणखी मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भूकंपामुळे म्यानमारच्या जमिनीत महत्त्वपूर्ण उर्जा निर्माण झाली आहे, जी भविष्यात अधिक तीव्र भूकंपांचे कारण ठरू शकते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत आणखी मोठे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे म्यानमारमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, आणि बचावकार्यही अडथळ्यांमुळे मंदावले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोहिनूर हिरा भारताला परत मिळणार? ब्रिटनच्या ‘या’ महत्त्वपूर्ण निर्णयानंतर चर्चेला उधान
म्यानमारला सध्या गृहयुद्ध आणि नैसर्गिक संकट अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हजारो लोकांचा जीव गेलेला असताना, शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. बचावकार्य अद्याप सुरू असले तरी, संपर्क यंत्रणा कोसळल्यामुळे मदतकार्यावर परिणाम होत आहे. भारताने तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला असला, तरी म्यानमारसमोर पुन्हा उभे राहण्याचे मोठे आव्हान आहे. म्यानमारमधील ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने घेतली पाहिजे आणि या संकटातून देशाला सावरण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. पुढील काही दिवस म्यानमारसाठी निर्णायक ठरणार असून, निसर्गाचा आणखी एक तडाखा बसू नये, अशीच सर्वांची प्रार्थना आहे.