ब्रिटनने नाझींनी लुटलेली ऐतिहासिक चित्रकला त्याच्या मूळ ज्यू वारसांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पावलानंतर कोहिनूर हिरा भारतात परत येण्याबाबत अटकळांना जोर आला आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
लंडन : ब्रिटनने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी लुटलेली ऐतिहासिक चित्रकला त्याच्या मूळ ज्यू वारसांना परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारतातून कोहिनूर हिऱ्याच्या पुनर्प्राप्तीबाबतच्या मागण्यांना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. अनेक दशकांपासून भारत हा हिरा परत मिळावा म्हणून ब्रिटनवर दबाव टाकत आहे, मात्र अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
ब्रिटिश सरकारने घोषित केले आहे की 1654 मध्ये चित्रकार ऐलसॅंड्रो टॅस्सी यांनी तयार केलेले ‘एनियास अँड हिज फॅमिली फ्लींग बर्निंग ट्रॉय’ हे ऐतिहासिक चित्र मूळ वारसांना परत करण्यात येणार आहे. बेल्जियन ज्यू कला संग्राहक सॅम्युअल हार्टवेल्ड यांच्या संग्रहातील हे चित्र 1940 मध्ये नाझी सैन्याने हिसकावले होते. टेट ब्रिटन संग्रहालयात तीन दशके प्रदर्शित केल्यानंतर आता ब्रिटिश प्रशासनाने ते योग्य वारसांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे भारतासह अनेक वसाहतकालीन शोषण भोगलेल्या देशांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे – जर नाझींनी लुटलेली संपत्ती परत केली जात असेल, तर ब्रिटिश वसाहतींमधून हिसकावलेला ऐतिहासिक वारसा परत का मिळू शकत नाही? भारत कोहिनूर हिऱ्याच्या पुनर्प्राप्तीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे, मात्र ब्रिटनने नेहमीच वेगवेगळी कारणे देऊन हा हिरा परत देण्यास नकार दिला आहे. कोहिनूर सध्या ब्रिटीश राजघराण्यातील मुकुटात जडवलेला आहे आणि तो ऐतिहासिक दृष्टीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांसाठी महत्त्वाचा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ‘हा’ मुलगा? ज्याने 3 आठवडे आधीच केली होती म्यानमारच्या भूकंपाची भविष्यवाणी
ब्रिटिश सरकारच्या या नव्या निर्णयाला स्पोलिएशन ॲडव्हायझरी पॅनेलने मान्यता दिली. हा पॅनेल नाझी राजवटीत गमावलेल्या सांस्कृतिक मालमत्तेच्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी 2000 साली स्थापन करण्यात आला होता. या पॅनेलने स्पष्ट केले की या चित्रकलेची जबरदस्तीने लूट झाली होती आणि ती परत केली जाणे आवश्यक आहे.
2009 साली ब्रिटनमध्ये ‘होलोकॉस्ट (लुटलेली कला) कायदा’ पारित करण्यात आला, जो नाझी राजवटीत लुटलेल्या कलाकृती मूळ वारसांना परत करण्याची परवानगी देतो. पण, हा कायदा केवळ नाझी लुटलेल्या वस्तूंवर लागू होतो, ब्रिटनच्या वसाहतींनी हिसकावलेल्या ऐतिहासिक वारशावर नाही.
ब्रिटनमधील अनेक संग्रहालये ब्रिटिश वसाहतींनी लुटलेल्या ऐतिहासिक वस्तू परत कराव्यात अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र, ब्रिटनमध्ये अद्याप असे काही कायदे अस्तित्वात आहेत, जे ऐतिहासिक वस्तू इतर देशांना परत करण्यास प्रतिबंध करतात. ब्रिटिश प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कोहिनूर हा 19व्या शतकात अधिकृतरित्या ब्रिटीश राजवटीकडे आला होता आणि त्यामुळे त्यावर कोणत्याही देशाचा हक्क नाही. मात्र, भारतीय इतिहासकार याला विरोध करताना म्हणतात की हा हिरा जबरदस्तीने हिसकावण्यात आला होता आणि त्यामुळे तो भारताला परत मिळायला हवा.
ब्रिटनच्या या निर्णयावर भारतीय इतिहासकार आणि संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नाझींनी लुटलेल्या संपत्तीबाबत न्याय दिला जात असेल, तर ब्रिटिश वसाहतींनी लुटलेल्या संपत्तीबाबत तोच न्याय का लागू होत नाही? ब्रिटिश संग्रहालयात आणि इतर संस्थांमध्ये भारतातील अनेक मौल्यवान वस्तू साठवलेल्या आहेत, ज्या वसाहती काळात जबरदस्तीने हस्तगत करण्यात आल्या होत्या. भारतासोबतच इजिप्त, ग्रीस, आफ्रिकन देश आणि चीन यांनीही ब्रिटनकडे त्यांचे ऐतिहासिक वारसे परत करण्याची मागणी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणचे शेवटचे काही क्षण शिल्लक! ट्रम्पच्या आदेशानंतर B-2 अणुबॉम्बर या देशाचा नकाशाच बदलणार
ब्रिटनच्या नव्या निर्णयामुळे आता जागतिक स्तरावर वसाहतकालीन लुटीच्या वस्तू परत करण्याची मागणी आणखी वाढू शकते. भारत सरकार आणि इतिहासकार यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण ब्रिटनने कोहिनूर हिरा परत करण्याचा निर्णय घेतल्यास, वसाहतींमधून हिसकावलेली इतर मौल्यवान संपत्तीही परत मिळू शकते.
पण ब्रिटन कोहिनूर परत करेल का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भारतीय सरकारने यावर अधिकृत मागणी केली असली, तरी ब्रिटनने यावर कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. तथापि, ब्रिटन जर नाझी काळातील संपत्ती मूळ वारसांना परत करत असेल, तर वसाहती काळात लुटलेली संपत्तीही परत करण्याची नैतिक जबाबदारी ब्रिटनवर आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता या प्रकरणावर ब्रिटनची भूमिका काय राहील आणि कोहिनूर भारतात परत येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.