
1 Trillion Trees Campaign Felix Finkbeiner Wangari Maathai Green Belt Movement
जागतिक हवामान बदल (Climate Change) आणि वाढत्या तापमानामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना, एका शाळकरी मुलाने दाखवलेल्या मार्गाने जगासमोर पर्यावरणाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. २००७ मध्ये जर्मनीतील अवघ्या नऊ वर्षांच्या फेलिक्स फिंकबाइनर या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने शाळेतील आवारात लावलेले एक छोटेसे रोप आज जगातील सर्वात मोठ्या पर्यावरण चळवळींपैकी एक बनले आहे. एका सामान्य शालेय अभ्यासातून (Homework Project) सुरू झालेल्या या कल्पनेने आज जगभरातील तरुणांना आणि विविध देशांना एकत्र आणत एक ट्रिलियन (१० खर्व) झाडे लावण्याचे महाकाय ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. (Felix Finkbeiner)
या सर्व प्रवासाची सुरुवात जानेवारी २००७ मध्ये झाली. फेलिक्सला शाळेत हवामान बदलावर एक सादरीकरण (Presentation) करायचे होते. त्यासाठी माहिती गोळा करत असताना त्याला केनियातील प्रसिद्ध पर्यावरणवादी केनियाच्या नोबेल विजेत्या वांगारी माथाई (Wangari Maathai) यांच्या ‘ग्रीन बेल्ट मूव्हमेंट’बद्दल माहिती मिळाली. माथाई यांच्या चळवळीने केनियातील महिलांना संघटित करून तब्बल ३ कोटी झाडे लावली होती. या प्रेरणेतूनच फेलिक्सने आपले सादरीकरण संपवताना एक धाडसी विचार मांडला “जगातील प्रत्येक देशातील मुलांनी एकत्र येऊन आपापल्या देशात १० लाख झाडे लावली पाहिजेत.”
आपल्या सादरीकरणानंतर २८ मार्च २००७ रोजी फेलिक्सने वर्गमित्रांच्या मदतीने शाळेच्या आवारात पहिले झाड लावले आणि ‘प्लांट-फॉर-द-प्लॅनेट’ (Plant-for-the-Planet) या ऐतिहासिक चळवळीचा पाया घातला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण उपक्रमाच्या (UNEP) पाठिंब्यामुळे या मोहिमेला अभूतपूर्व गती मिळाली. अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे २०१० पर्यंत, एकट्या जर्मनीमध्येच या मोहिमेअंतर्गत १० लाखवे झाड लावून एका मोठ्या टप्प्याची नोंद करण्यात आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
फेलिक्सचे हे कार्य केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित राहिले नाही. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी या मुलाने संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत जगातील बड्या नेत्यांसमोर भाषण देऊन हवामान बदलावर त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले. आज वीस वर्षांनंतरही ही संस्था मेक्सिको, घाना, स्पेन यांसारख्या अनेक देशांत प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि संवर्धनाचे मोठे प्रकल्प चालवत आहे. ‘प्लांट-फॉर-द-प्लॅनेट’ने स्वतःच्या प्रकल्पांतर्गत ३६ दशलक्षाहून अधिक झाडे लावली असून, त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जगभरातील ११० दशलक्षाहून अधिक वृक्षांच्या रोपणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
पर्यावरण चळवळीत लोकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी फेलिक्स आणि त्याच्या टीमने २०१२ मध्ये ‘द चेंज चॉकलेट’ (The Change Chocolate) ही भन्नाट संकल्पना सुरू केली. नागरिक जेव्हा हे चॉकलेट खरेदी करतात, तेव्हा त्यातील नफ्याचा थेट हिस्सा नवीन झाडे लावण्यासाठी वापरला जातो. या एकाच चॉकलेट उपक्रमाने आतापर्यंत १ कोटींहून अधिक झाडे लावण्यासाठी लागणारा निधी यशस्वीपणे उभारला आहे.
या मोहिमेत केवळ कृत्रिमरीत्या रोपे लावण्यावरच भर दिला जात नाही, तर निसर्गाच्या पुनरुज्जीवनावरही (Natural Restoration) लक्ष केंद्रित केले जाते. जर जमिनीत आधीपासूनच बिया असतील आणि शेजारी निरोगी जंगल असेल, तर केवळ झाडांच्या वाढीतील मानवी अडथळे दूर करून निसर्गाला स्वतःचे जंगल पुन्हा उभारू दिले जाते. तर अत्यंत खराब झालेल्या किंवा ओसाड जमिनींवर प्रत्यक्ष रोपे लावून पुनर्वनीकरण (Reforestation) केले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
१ ट्रिलियन झाडे लावण्याचे आकडा हे एक जागतिक उद्दिष्ट आहे. याचे स्वरूप असे आहे की जगभरातील सर्व देश, संस्था आणि नागरिकांनी मिळून हे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र, ‘प्लांट-फॉर-द-प्लॅनेट’ ही संस्था स्पष्टपणे सांगते की, केवळ नवी झाडे लावणे हा कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा एकमेव किंवा अंतिम पर्याय असू शकत नाही. जीवाश्म इंधनाचा (Fossil Fuels) वापर कमी करणे तितकेच गरजेचे आहे.
तसेच, नव्याने लावलेल्या एका रोपाला पूर्ण वाढून जुन्या झाडाएवढा कार्बन शोषून घेण्यासाठी अनेक दशके लागतात. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या प्राचीन जंगलांचे आणि झाडांचे रक्षण करणे ही सर्वात पहिली पायरी आहे. जमिनीवर नवीन रोप लावणे ही केवळ एका मोठ्या आणि दीर्घकालीन लढ्याची सुरुवात असते. फेलिक्सच्या या उपक्रमाने हे सिद्ध केले आहे की, जर लहान वयात मनात एखादा चांगला विचार आला आणि त्याला कठोर परिश्रमांची जोड मिळाली, तर एका ९ वर्षांच्या मुलाचे स्वप्नही संपूर्ण जगाची दिशा बदलू शकते.