
Flydubai emergency landing Saudi Arabia Flydubai flight 1073 incident
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई फ्लाईट १०७३ मध्ये हवेतच घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विमानाचे मुख्य कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला करून विमान सुमारे १४,००० फूट खाली नेण्याचा आणि ते पाडण्याचा प्रयत्न ओमानच्या सह-वैमानिकाने केला. मात्र, जखमी अवस्थेतही कॅप्टनने दाखवलेले धैर्य आणि प्रवाशांच्या तत्परतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेनंतर कॉकपिटमध्ये उपस्थित असलेल्या आणि कॅप्टनवर उपचार करणाऱ्या जॉर्जियन दंतवैद्य डॉ. शोटा मुसायेव यांनी घडलेला सर्व थरार माध्यमांसमोर मांडला आहे.(Flydubai Flight 1073)
ब्रिटिश वृत्तपत्र ‘डेली मेल’ आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांशी बोलताना डॉ. शोटा मुसायेव यांनी सांगितले की, जेव्हा मुख्य कॅप्टन स्मित मच्छर यांनी आपल्या उरल्यासुरल्या ताकदीने कॉकपिटचे दार अनलॉक केले, तेव्हा विमानात असलेले काही शूर प्रवासी त्वरित आत घुसले. त्यांनी ओमानमध्ये जन्मलेल्या त्या सह-वैमानिकाला पकडले, त्याला घट्ट बांधले आणि जमिनीवर पाडले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरून आणि शरीरावरून रक्त वाहत होते. स्वतःला असहाय्य पाहून आणि आपला डाव उधळला गेल्याचे लक्षात येताच, तो सह-वैमानिक ओरडू लागला आणि “मला जिवंत सोडू नका, मला आत्ताच मारून टाका,” अशी विनवणी करू लागला. मात्र, प्रवाशांनी त्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष करत त्याला सुरक्षितपणे पोलिसांच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सह-वैमानिकाने कॉकपिटमधील कंट्रोल पॅनेलवर उभे राहून विमानाचे नियंत्रण नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे विमान वेगाने खाली येऊ लागले होते. परंतु, मुख्य पायलट स्मित मच्छर यांनी गंभीर दुखापत झाली असतानाही कॉकपिटचे दार उघडले, ज्यामुळे बाहेर बसलेल्या प्रवाशांना आत येण्याची संधी मिळाली. विमानातील इतर ऑफ-ड्यूटी पायलट आणि प्रवाशांच्या मदतीने विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आले व ते सौदी अरेबियात सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?
या घटनेनंतर सौदी प्रशासनाने तातडीने कारवाई करत सह-वैमानिकाला ताब्यात घेतले आणि प्राथमिक चौकशीनंतर त्याला पुढील तपासासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) हवाली केले आहे. प्राथमिक अहवालात सह-वैमानिक आणि मुख्य कॅप्टन यांच्यात झालेल्या वादाचा उल्लेख असला, तरी यामागे अधिक गंभीर कारणे असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सांगितले जात आहे.
या घटनेवर विविध देशांतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वैयक्तिक वादाचा सिद्धांत फेटाळून लावत हा एक कट्टरतावादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, ओमानचा हा सह-वैमानिक अत्यंत कट्टरपंथी विचारांनी प्रभावित झाला होता. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा संशय व्यक्त केला आहे की, हा सह-वैमानिक इराणच्या प्रभावाखाली काम करत असावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ओमानचा सह-वैमानिक कामाच्या ठिकाणी खूप कमी बोलायचा आणि अत्यंत पुराणमतवादी विचारांचा होता. विमानातील महिला कर्मचाऱ्यांशी किंवा प्रवाशांशी साधे हस्तांदोलन करण्यासही तो नकार द्यायचा. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच तो फ्लायदुबई कंपनीत सामील झाला होता. सध्या युएई आणि इतर आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा या घटनेच्या सर्व बाजूंनी सखोल चौकशी करत आहेत.