
Hong Kong Fire 4,600 Homes Lost 94 Dead Who’s Responsible
Hong Kong fire 2025 : हाँगकाँगमधील (China) वांग फुक कोर्ट या विशाल निवासी संकुलात लागलेली भीषण आग शहराने मागील ७० वर्षांत पाहिलेली सर्वात दारुण दुर्घटना ठरली आहे. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी अचानक भडकलेल्या आगीने काही क्षणांतच संपूर्ण परिसराला कवेत घेतले आणि सात उंच ३२ मजली इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या. या भयावह घटनेत आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली असून २८० हून अधिक रहिवाशी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश असून अनेकांनी जीव धोक्यात घालून बचावकार्य केले.
या प्रचंड आगीने संकुलातील सर्व मार्ग, जिने आणि वरच्या मजल्यांकडे जाणारे मार्ग चुटकीसरशी ज्वाळांनी बंद केले. त्यामुळे अनेक रहिवाशी आपल्या घरांत अडकून पडले. ७६ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यापैकी ४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीच्या दुसऱ्या दिवशीदेखील इमारतींच्या वरच्या मजल्यांवर धुराचा आणि ठिणग्यांचा मोठा भडका दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हजारो बचावदलाचे जवान अविरतपणे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guinea-Bissau : आता ‘या’ देशातही निवडणुकीनंतर अवघ्या तीनच दिवसात झाले सत्तापालट; सीमा केल्या बंद अन् राष्ट्रपती बेपत्ता
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, वांग फुक कोर्ट कॉम्प्लेक्सची उभारणी १९८३ मध्ये करण्यात आली होती. ८ बहुमजली इमारती, एकूण १,९८४ फ्लॅट्स आणि २०२१च्या जनगणनेनुसार ४,६०० रहिवाशी इतक्या मोठ्या जनसमुदायाचे हे निवासस्थान एका क्षणात राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेकडो कुटुंबांचे संपूर्ण आयुष्याचे संसार आगीत जळून गेले असून अनेकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
या दुर्घटनेचे कारण नेमके काय, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष लागला नसला तरी आग इतक्या वेगाने पसरली यामागे बांधकामादरम्यान वापरलेल्या ज्वलनशील मचान व फोम मटेरियलला जबाबदार धरले जात आहे. हाँगकाँग पोलिसांनी याबाबत फौजदारी चौकशीचे आदेश दिले असून बांधकाम कंपनीचे तीन अधिकारी अटकेत आहेत. पोलिस अधीक्षक आयलीन चुंग यांनी स्पष्ट केले की कंपनीने “अत्यंत निष्काळजीपणा” दाखवल्याने आग नियंत्रणाबाहेर गेली आणि प्रचंड जीवितहानी झाली.
सरकारने तत्काळ उपाययोजना म्हणून ३०० दशलक्ष हाँगकाँग डॉलर्सचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. विस्थापित नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय, वैद्यकीय मदत, अन्नसामग्री आणि पुनर्वसनासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा उंच इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने
ही घटना हाँगकाँगच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठ्या नागरी आपत्तींपैकी एक म्हणून नोंदली जाणार आहे. प्रचंड मानवी हानी, उध्वस्त झालेली घरे आणि बेपत्ता नागरिकांची वाढती संख्या या सगळ्यामुळे संपूर्ण शहर हदरले आहे. आगीचा ठावठिकाणा शोधून कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा या दिशेने जोरदार पावले उचलत असून येणाऱ्या काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियमांना तयार राहण्याचे संकेत मिळत आहेत.
Ans: आत्तापर्यंत ९४ मृत आणि २८० बेपत्ता आहेत.
Ans: ज्वलनशील मचान आणि फोम मटेरियलमुळे आग जलद पसरल्याचा प्राथमिक अंदाज.
Ans: ३०० दशलक्ष HK$ चे विशेष मदत पॅकेज.