आता 'या' देशात झाले आहे सत्तापालट; लष्कराने नियंत्रण मिळवले, सीमा बंद झाल्या आणि राष्ट्रपती बेपत्ता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Guinea-Bissau coup 2025 : गिनी-बिसाऊमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट झाला असून पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) या छोट्या देशात राजकीय घडामोडींनी अचानक नाट्यमय वळण घेतले आहे. निवडणुकीनंतर अवघ्या तीन दिवसांत लष्कराने मोठ्या बंडाची घोषणा केली आणि संपूर्ण देशाचा ताबा आपल्या ताब्यात घेतल्याचा दावा केला. राजधानी बिसाऊमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर २०२५) दुपारी मोठा गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आणि काही क्षणांतच शहरात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले.
गोळीबाराचे आवाज राष्ट्रपती राजवाड्याभोवती ऐकू येऊ लागल्यानंतर बिसाऊच्या प्रमुख भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात झाले. जड बॅरिकेड्स उभारून संपूर्ण परिसर सैनिकांच्या नियंत्रणाखाली देण्यात आला. अचानक उभ्या राहिलेल्या या परिस्थितीमुळे नागरिक घाबरून राजधानी सोडून इतर भागाकडे पळू लागले. पत्रकारांना मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राष्ट्रपती संकुलाला लष्कराने घेराव घातला असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे.
या परिस्थितीतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राष्ट्रपती उमरो सिसोको एम्बालो यांचा ठावठिकाणा. लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर अनेक तास उलटूनही ते सुरक्षित आहेत की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यांच्या बेपत्ता स्थितीमुळे देशातील परिस्थिती अजूनच गंभीर झाली आहे. आधीच निवडणुकीच्या निकालांमुळे निर्माण झालेला राजकीय तणाव आता पूर्ण विकसित संकटात रूपांतरित झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : कधीही होऊ शकते युद्ध! Durand Lineवर हालचालींना वेग; पाकिस्तानची आता खैर नाही, सूडाच्या आगीत पटले ‘हे’ देश
या संकटाची पार्श्वभूमी मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांत दडलेली होती. राष्ट्रपती आणि संसदीय निवडणुकांचे निकाल २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. पण निकाल जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी स्वतंत्र विजयाचा दावा केला होता. ही परिस्थिती २०१९ च्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती होती, जिथे निकाल वादांमध्ये अडकून महिन्यांपर्यंत देशात राजकीय गोंधळ माजला होता.
Breaking News: Guinea Bissau Military has taken power French backed President Sissoco Embalo has been arrested pic.twitter.com/zyElfx1OSX — MK Party Stan (@XFactor079) November 26, 2025
credit : social media and Twitter
यावर्षीही निवडणूक प्रक्रिया सुरुवातीपासून वादात होती. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य विरोधी पक्ष PAIGC ला निवडणूक लढवण्यास बंदी घातल्याने आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. विरोधी पक्षांनी या निर्णयाला राजकीय दबावाचे उदाहरण म्हटले, तर सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर कारणे दिली. त्यातच राष्ट्रपती एम्बालो यांचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपूनही त्यांनी पद सोडण्यास नकार दिल्याने लोकशाही प्रक्रियेवरील प्रश्न आणखी गंभीर झाले.
गिनी-बिसाऊच्या राजकीय इतिहासात लष्करी बंड हे नवीन नाही. १९७४ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाने चार यशस्वी सत्तापालट अनुभवले आहेत, तर अनेक अयशस्वी प्रयत्नही झाले आहेत. भ्रष्टाचार, गरिबी, ड्रग तस्करी आणि संघटित गुन्हेगारी या समस्यांनी देशातील राजकीय व्यवस्थेची घडी नेहमीच विस्कटलेली राहिली आहे. त्यामुळे ताज्या उठावाने देशाची अस्थिरता पुन्हा एकदा जगासमोर उघड केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dhaka Updates : बांगलादेशमध्ये सत्तासंघर्ष तीव्र! अवामी लीगची युनूस सरकारविरुद्ध युद्धघोषणा; 30 नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी आंदोलन
सैन्याने निवडणुकीशी संबंधित सर्व प्रक्रिया ‘तात्काळ थांबवण्याचा’ आदेश दिला असून देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या कृतीमुळे देश पूर्णत: लष्करी नियंत्रणाखाली गेला आहे. जागतिक समुदायाने या घटनांकडे लक्ष ठेवले असून आफ्रिकेतील पुन्हा वाढणाऱ्या लष्करी उठावांच्या मालिकेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Ans: निवडणुकीनंतर सैन्याने बंड करून संपूर्ण देशाचा ताबा घेतला.
Ans: त्यांचा ठावठिकाणा अद्याप अस्पष्ट आहे आणि ते बेपत्ता आहेत.
Ans: लष्करी उठावानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सर्व सीमा बंद करण्यात आल्या.






