SCO शिखर परिषदेत भारताने मांडले 'हे' महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या मुख्य गोष्टी
इस्लामाबाद: शांघाय कोऑपरेशन समिट ( SCO) बैठक काल (दि. 16) पाकिस्तनच्या इस्लामाबादमध्ये पार पडली. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीत SCO च्या प्रमुख कागदपत्रांवर सर्व सदस्य देशांनी स्वाक्षरी केल्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारताने या चर्चेत सकारात्मक आणि रचनात्मक योगदान दिले, तसेच काही महत्त्वाचे मुद्यांकडे इतर देशांचे लक्ष वेधले.
हे महत्त्वाचे मुद्दे भारताने परिषदेत मांडले
भारताने “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या वैश्विक कल्पनेवर आधारित संवाद विकसित करण्यावर भर दिला. तसेच, SCO स्टार्टअप फोरम, स्टार्टअप्ससाठी विशेष कार्य गट (SWG), नवकल्पना आणि पारंपारिक औषध यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमांना इतर देशाच्या प्रतिनिधींनी समर्थन दिले. भारताच्या प्रयत्नांमुळे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) आणि डिजिटल समावेश हे SCO सहकार्याच्या फ्रेमवर्कचा भाग बनेल असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले. तसेच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांची (UNSDGs) पूर्तता करण्यासाठी मिशन लाइफकडून प्रेरणा घेण्याचा प्रस्ताव परिषदेत मांडला.
जागतिक अन्नसुरक्षा आणि पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी, भारताने हवामानास अनुकूल आणि पौष्टिक धान्ये, विशेषतः बाजरीचा वापर वाढवण्यावर भर दिला. याशिवाय, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून निष्पक्ष आणि संतुलित कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचा विकास करण्यावरही भर दिला. भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांवर आधारित, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय संरक्षणवादी धोरणे व व्यापार निर्बंधांना विरोध दर्शवला. याच वेळी भारताने SCO च्या पुढील अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल रशियाचे अभिनंदन केले आणि आगामी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
पाकिस्तान आणि चीनला संदेश
या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला म्हटले की, विश्वास, सहकार्य आणि चांगल्या शेजारीपणाच्या अभावामुळे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. SCO (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना, त्यांनी मैत्री आणि परस्पर विश्वासाच्या महत्त्वावर जोर दिला. जयशंकर यांनी सांगितले की, संघटनेचा उद्देश प्रादेशिक सहकार्य वाढवणे, समतोल विकास साधणे आणि संघर्ष टाळणे हा आहे. SCO चार्टरनुसार, मुख्य आव्हाने दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी यांचा सामना करण्यासाठी संघटना वचनबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. या सहकार्यामुळे एकात्मतेचे फायदे मिळू शकतात.