PAK सरकासोबत चर्चा करण्यास इम्रान खान यांनी दर्शवली तयारी; 'या' अटी कराव्या लागतील मान्य
इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. सध्या शेहबाज शरीफ यांचे सरकार आणि इम्रान खान यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन तणाव सुरु आहे. शेहबाज शरिफ यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान सरकार आणि इम्रान खान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे दिसत आहे. कारण म्हणजे सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेले इम्रान खान आता सरकारसोबत चर्चा करण्यास तयार झाले आहेत.
PTI कडून प्रतिनिधी समिती तयार
मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेच्या प्रक्रियेसाठी त्यांनी आपल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाकडून एक प्रतिनिधी समिती तयार केली आहे. सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे (एसआयसी) प्रमुख साहिबजादा मोहम्मद हमीद रजा यांची या समितीचे प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच इम्रान खान यांनी या चर्चेच्या प्रक्रियेला सार्थक करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत तुरुंगात बैठक घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे सांगण्यात आले की, चर्चेच्या प्रक्रियेची योग्य दिशा ठरवण्यासाठी आणि मुद्द्यांवर स्पष्टता मिळवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.
इम्रान खान यांच्या मागण्या
इम्रान खान यांनी सरकारकडे दोन मुख्य मागण्या केल्या आहेत. पहिली, सर्व राजकीय कैद्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी दुसरी, 9 मे आणि 26 नोव्हेंबर 2023 रोजी घडलेल्या घटनांच्या तपासासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करावा. इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारने या मागण्यांवर सकारात्मक पाऊल उचलल्यास ते सविनय अवज्ञा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यास तयार आहेत. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकार आणि PTI पक्षाच्या नेत्यांमध्ये नुकतीच पहिली बैठक पार पडली. या बैठकीत इम्रान खान यांच्या सुटकेसह इतर वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूंनी चर्चेची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सहमती दर्शवली. यामुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण थोडे निवळण्याची शक्यता आहे.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर तणावात वाढ
गेल्या वर्षी इम्रान खान यांच्या अटकेनंतर PTI पक्ष आणि सरकारमध्ये तणाव वाढला होता. इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशभरात तीव्र विरोध प्रदर्शन झाले. त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी देखील कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. आता इम्रान खान आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या या चर्चेने देशातील राजकीय अस्थिरतेवर काही प्रमाणात तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. इम्रान खान यांच्या सुटकेबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसला, तरीही या चर्चेमुळे सकारात्मक वाटचाल होण्याची चिन्हे दिसत आहेत.