
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आलेल्या इम्रान खानला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने इम्रान खानची १४ दिवसांची कोठडी मागितली, त्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान,माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप इम्रान खान यांनी कोर्टात केला आहे.
[read_also content=”इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानानात तणाव; ठिकठिकाणी हिंसाचार, जाळपोळ, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, https://www.navarashtra.com/world/6-deaths-so-far-in-violence-after-tension-in-pakistan-as-former-pm-imran-khans-arrest-nrps-397085.html”]
पीटीआयचे नेते शेख रशीद यांनीही मंगळवारी सांगितले की, इम्रान खान यांची हत्या होऊ शकते. इम्रान खान यांनी हत्येची भीती व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हे फक्त नाटक करत असल्याचे म्हटलं आहे. आज इम्रान खान यांना इस्लामाबाद पोलीस लाईनमध्येच स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने सांगितले की, जमीन घोटाळ्याप्रकरणी इम्रान खानची चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी आवश्यक आहे.
त्यावर न्यायालयाने सुनावणी घेत निर्णय राखून ठेवला. दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थक नेत्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असद उमर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. इतकंच नाही तर पीटीआय नेते शाह मेहमूद कुरेशी यांनी त्यांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. असद उमरच्या अटकेलाही त्यांनी दुजोरा दिला. शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, ‘या लोकांनी असद उमर साहिब यांना अटक केली आहे. पण मी तेथून पळ काढला आणि कोर्टात प्रवेश केला. आता मी सुरक्षित ठिकाणी आहे आणि तिथून माझा संदेश रेकॉर्ड करत आहे.