India and Sri Lanka ink news agreements, Prime Minister Narendra Modi's visit to Sri Lanka begins an era of cooperation
नवी दिल्ली/कोलंबो: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमार दिसनायका यांच्यात शनिवारी येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारत आणि श्रीलंकेने संरक्षण सहकार्याबाबतचा पहिलाच सामंजस्य करार केला. दोन्ही देशांनी त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी यूएईसह त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. एलटीटीईच्या पतनानंतर पहिल्यांदाच भारत आणि श्रीलंकेत सहकार्याचे पर्व सुरू झाले आहे. संरक्षण सामंजस्य कराराबद्दल श्रीलंकेचे संरक्षण सचिव संपत थुयाकॉथा म्हणाले की, या सामंजस्य करारांतर्गत हाती घेतलेले कोणतेही सहकार्य उपक्रम आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम मानकांनुसार असतील आणि श्रीलंका किंवा भारताच्या देशांतर्गत कायदे आणि राष्ट्रीय धोरणांशी विसंगत नसतील. त्यांनी सांगितले की, श्रीलंका आणि भारत यांच्यात दशकांपासून सौहार्दपूर्ण संरक्षण संबंध आहेत. ते संयुक्त लष्करी आणि नौदल सराव, प्रशिक्षण, कार्यशाळा इत्यादींमध्ये सहभागी आहेत.
पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांनी भारतातर्फे हाती घेण्यात येणाऱ्या समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आणि दंबुला येथील तापमान नियंत्रित गोदामाचे उद्घाटन आणि देशभरातील ५,००० धार्मिक संस्थांमध्ये छतावरील सौर पॅनेलचे उद्घाटन करण्यात आले.
श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासन दिले की, भारताच्या सुरक्षेच्या हितासाठी त्यांचा देश आपल्या भूभागाचा वापर कोणत्याही देशाला करू देणार नाही. चीनच्या श्रीलंकेतील वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमिवर दिसानायके यांचे हे विधान महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान मोदींचा हा चौथा श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने श्रीलंका मित्र विभूषण ने सन्मानित करण्यात आले. श्रीलंकेचा हा पुरस्कार श्रीलंकेसोबत विशेष मैत्री आणि सहकार्य जोपासणाऱ्या विशेष व्यक्तींना देण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी “हा केवळ माझा सन्मान नाही तर 140 कोटी भारतीय नागरिकांचा आहे,” असे म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, हा पुरस्कार भारत आणि श्रीलंकामधील घट्ट मैत्रीचे आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे. भारत फक्त शेजारी देश नाही, तर खरा मित्र आहे.