नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; उत्तर प्रदेशसह बिहार, उत्तरखंडात पोलिसांचा फौजफाटा तैनात
नवी दिल्ली : नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहिला मिळत आहे. यामुळे येथील परिस्थिती बिकट बनत आहे. असे असताना नेपाळ सरकारविरुद्ध तरुणांच्या बंडामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे भारतीय सीमावर्ती भागात दक्षता वाढविण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, उत्तराखंडला लागून असलेल्या भागात पोलिस पथके सतत सतर्क आहेत. या भागात व्यावसायिक घडामोडींवरही परिणाम झाला आहे.
नेपाळमधील आंदोलक जाळपोळ करताना बिहारमधील गलगलियाजवळील भारतीय सीमावर्ती भागात पोहोचले होते, ज्यांना एसएसबी सैनिकांनी हाकलून लावले. किशनगंजच्या पोलिस अधिकाऱ्यांनी गलगलिया सीमावर्ती भागाचा आढावा घेतला. भारत-नेपाळच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. बिहार पोलिस मुख्यालयाने पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया आणि किशनगंज या ७ सीमावर्ती जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेदेखील वाचा : KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील सोनौली, थुथीबारी, बरहनी, खुनुआ आणि काकरहवा सीमेवर सुरक्षा वाढवून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नेपाळ हिंसाचाराचा परिणाम श्रावस्ती, बहराइच आणि बलरामपूरपर्यंत दिसून येत आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील पानीटंकी सीमेवर पोलिसांनी तपासणी सुरू केली. श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.
नेपाळ पोलिसांशी सतत संपर्क
दार्जिलिंगचे पोलिस अधीक्षक प्रवीण प्रकाश म्हणाले की, नेपाळ पोलिसांशी सतत संपर्क आहे आणि नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या सीमेवरील सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात असलेल्या पोलिस आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांनी संयुक्तपणे गस्त वाढविली आहे.
सीमेवरील प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष
पिथोरागडच्या पोलिस अधीक्षक रेखा यादव यांच्या सूचनेनुसार, सीओ गोविंद बल्लभ जोशी आणि केएस रावत यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस आणि एसएसबी जवानांनी काली नदीच्या काठावर आणि सीमा पोलिस स्टेशन परिसरातील संवेदनशील भागात गस्त घातली. सीमेवरील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी, पोलिसांनी सर्वसामान्यांना त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले.
ओली नेपाळमधून बाहेर
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे झालेल्या गोंधळानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. सध्या ते नेपाळच्या बाहेरच्या देशात असल्याची माहिती देण्यात आली आहे.