India Rejects Trump's business claim on India Pakistan ceasefire
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम फत्ते करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचा जळफळाट झाला होता. यानंतर पाकिस्तानने भारताच्या पश्चिम भागातील राज्यांमध्ये हवाई हल्ले करण्यास सुरूवात केली, मात्र भारताने पाकिस्तानचा एकही डाव यशस्वी होऊ दिला नाही. दरम्यान १० मे रोजी पाकिस्तान आणि भारताच्या डीजीएमोने चर्चा करुन युद्धबंदीची घोषणा केली.
परंतु दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकमध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. तसेच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानने युद्ध थांबवले नाही तर अमेरिका त्यांच्यासोबत व्यापार करणार नाही, असेही म्हटले होते. परंतु भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले की, केवळ दोन्ही देशांच्या डीजीएमोमध्ये युद्धविरामावर चर्चा झाली, यामध्ये तिसरा कोणताही पक्ष सामील नव्हता. ट्रम्प यांचे विधान निराशाजनकच नव्हे तर जागतिक स्तरावर भारताची भूमिका कमजोर करणारी आहे.
भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदींशी ९ मे ला चर्चा केली होती. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ८ मे आणि १० मे रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती. परंतु या चर्चेदरम्यान भारताने किंवा अमेरिकेने व्यापारावर कोणतीही चर्चा केली नाही.
ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तानने युद्ध थांबवले नाही, तर अमेरिका त्यांच्याशी कोणताही व्यापार करणार नाही. जर संघर्ष थांबला तर आम्ही तुमच्यासोबत व्यापर करुन. आमच्यासारखा व्यापर व्यावसाय कधीही अन्य कोणी केला नसेल. ट्रम्प यांनी म्हटले की, दोन अण्वस्त्रधारी देशामधील वाढता तणाव कमी करण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्हाईट हाऊमध्ये पत्रकारांशी बोसतान ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे दोन्ही देशातील तणाव निव्वळला असल्याचे त्यांनी म्हटले होते.
तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या काश्मीर मुद्द्यामध्येही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी म्हटले होते की, मी दोन्ही देशांमध्ये काश्मीर मुद्द्यावरही तोडगा काढण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी दोन्ही देशांसोबत एकत्रितपणे चर्चा होईल.
तसेच युद्धबंदीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील युद्धविराम घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे आभार मानले होते. शाहबाज यांनी म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीचे आभार मानतो, तसेच इतर मित्र राष्ट्रांच्या भूमिकेचेही कौतुक करतो. तसेच शाहबाज यांनी काश्मीर मुद्द्यावरही ट्रम्प यांचे आभार मानले होते.
दरम्यान भारताने काश्मीर हा मुद्दा नेहमीच अंतर्गत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेपण भारताने स्वीकारलेला नाही आणि स्वीकारणार नाही. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या मध्यस्थीचे विधान केवळ जागतिक स्तरावर भारताची भूमिका कमी करणे आहे.