Indian nurse Nimisha Priya to be hanged in Yemen on July 16 after years of struggle
Nimisha Priya Death Sentence : केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एक गरीब कुटुंबातील मुलगी निमिषा प्रिया. ती केवळ एक नर्स नव्हती, तर एक स्वप्न पाहणारी आणि ते पूर्ण करण्यासाठी झगडणारी भारतीय महिला होती. आज ती येमेनमध्ये मृत्यूशिक्षेच्या उंबरठ्यावर उभी आहे. १६ जुलै २०२५ रोजी तिच्यावर फाशीची शिक्षा होणार आहे. पण तिची कहाणी ही केवळ गुन्ह्याची नाही, तर अन्याय, छळ, आणि जगण्यासाठी चाललेल्या धडपडीची आहे.
२०११ मध्ये नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून निमिषा नोकरीसाठी येमेनमध्ये पोहोचली. सुरुवातीला तिने राजधानी साना येथील हॉस्पिटलमध्ये नोकरी केली आणि नंतर २०१५ मध्ये एका येमेनी व्यक्तीच्या मदतीने खाजगी वैद्यकीय क्लिनिक सुरू केले. हा व्यक्ती होता तलाल अब्दो महदी, जो पुढे तिच्या जीवनातील दुःस्वप्न ठरला. तलालने बनावट कागदपत्रांद्वारे स्वतःला तिचा पती घोषित केले. त्याने तिचा पासपोर्ट काढून घेतला, तिला मानसिक आणि शारीरिक छळ दिला, धमकावले, पैसे उकळले. भारतात परतण्याचा तिचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला, कारण तिचा पासपोर्ट त्याच्याकडे होता.
२०१७ मध्ये, निमिषाने सुटकेचा मार्ग शोधला. तिने तलालला बेशुद्ध करून पासपोर्ट परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण औषधाच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना जरी अपघाती असली, तरी येमेन न्यायालयाने २०१८ मध्ये तिला हत्येचा दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. तेव्हापासून ती तुरुंगात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा’ देश बनवत आहे जगातील सर्वात घातक 6th जनरेशन ‘F-47’ लढाऊ विमान; 5 महिन्यांपासून गुप्त चाचण्या सुरू
भारत सरकारने या प्रकरणात लक्ष घातले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने येमेन सरकारशी संपर्क साधला असून दया याचिकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध मानवाधिकार संघटना आणि स्थलांतरितांच्या संघटनांनीही निमिषासाठी आवाज उठवला आहे. त्यांचा दावा आहे की हे स्वसंरक्षणाचे प्रकरण असून तीला ठार मारण्याचा हेतू नव्हता.
‘रक्तदाम’ म्हणजेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई देऊन मृत्युदंड टाळण्याची येमेनी परंपरा हा एक पर्याय उरलेला आहे. तलालच्या कुटुंबाने भरपाई स्वीकारल्यास निमिषाचा जीव वाचू शकतो. कोचीमध्ये घरगुती काम करणाऱ्या तिच्या आईने केस चालवण्यासाठी आपले घरही विकले. वकिल सुभाष चंद्रन यांच्या म्हणण्यानुसार, लाखो रुपये गोळा करण्यासाठी व्यापारी, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नवा जागतिक संघर्ष उभा राहणार? अंटार्क्टिकामध्ये सौदीपेक्षा दुप्पट तेलसाठा, रशियाच्या दाव्याने जगभरात खळबळ
निमिषा प्रियाची कहाणी केवळ तिच्या व्यक्तिगत जीवनापुरती मर्यादित नाही, तर ती परदेशी नर्सेसच्या सुरक्षिततेच्या प्रश्नालाही उजाळा देते. आजही हजारो भारतीय महिला आखाती देशांमध्ये नर्सिंगसारख्या व्यवसायात काम करत आहेत आणि अनेकदा शोषणाचे बळी ठरत आहेत. १६ जुलैच्या आधीचा प्रत्येक दिवस निर्णायक आहे. जर मानवीयता आणि न्यायाचा विजय व्हायचा असेल, तर भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन निमिषासाठी आशेचा किरण जिवंत ठेवावा लागेल.