
इराणने इस्रायलवर मोठा हल्ला चढवला,
तेहरान : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलच्या दोन शहरांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. दक्षिण इस्रायलमधील दिमोना शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. तर अराद शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 50 हून अधिक लोक जखमी झाले.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यांनंतर सांगितले की, ते आपत्कालीन मदत आणि बचाव दलांना अधिक मजबूत करत आहेत. इस्रायली माध्यमांनुसार, अराद हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. आमच्या भविष्यातील लढाईसाठी ही एक अत्यंत कठीण रात्र आहे. आम्ही प्रत्येक आघाडीवर आमच्या शत्रूंवर हल्ला सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहोत, असे नेतन्याहूंनी सांगितले. मध्यपूर्वेतील संघर्षात इराणने प्रथमच इस्रायलच्या अणुसुविधेला लक्ष्य केले आहे. इराणने आपल्या नतान्झ अणुसुविधेवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच हा हल्ला केला.
विशेष म्हणजे, पश्चिम आशियातील संघर्षाने चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला एक धोकादायक नवीन वळण घेतले आहे. इस्रायलचे प्रमुख अणुऊर्जा केंद्र असलेले दिमोना, ‘लिटल इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते. या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बचाव पथकांच्या माहितीनुसार, जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अरादमधील क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात इस्रायल ‘फेल’
एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, क्षेपणास्त्र एका इमारतीवर आदळले आणि जवळच्या घरांचे नुकसान झाले. बहुतेक लोक आश्रयस्थानांमध्ये होते, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले नाहीत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अरादमधील थेट क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल इस्रायली हवाई दलाने चौकशी सुरू केली आहे. क्षेपणास्त्र रोखण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरल्याचेही समोर आले आहे.
इराकलाही बसला मोठा फटका
दुसरीकडे, इराकची राजधानी बगदाद पुन्हा एकदा हादरली आहे. शनिवारी सकाळी एका संशयास्पद ड्रोनने थेट इराकी इंटेलिजन्स सर्व्हिस(INIS) च्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा फटका इराकला बसत असल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा : Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार