Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला नतान्झ युरेनियम संवधर्न केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. इराणच्या वृत्तसंस्था तस्नीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात अणू केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सर्वत्र रेडिएशनच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु अद्याप रेडिएशनचा कोणताही धोका असल्याचे समोर आलेले नाही. परंतु हा हल्ला इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का मानला जात आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला चढवला होता. आज या युद्धाला २२ दिवस उलटले आहे. या युद्धाता आतापर्यंत दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले करण्यात आले असून इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, इराणचे अनेक सरकारी वरिष्ठ व लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने ठार केले आहे. तसेच नवे सुप्रीम लीडर देखील सध्या जखमी असून गुप्त ठिकाणी आहेत. याशिवाय इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावरही हल्ला केला आहे.
दुसरीकडे इस्रायल-अमेरिकी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील मध्यपूर्वेतील आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि दूतावासांवर हल्ले केले आहेत. कतारमधील जगातील सर्वात मोठ्या गॅस प्लांट रास लफानवर इराणने घातक वार केला आहे. तसेच युएईमधील नैसर्गिक गॅस प्लांट हबशानवरही हल्ले करण्यात आळे आहे. दोन्ही देशांमध्ये टिट फॉर टॅटची स्पर्धा सुरु असल्यासारखी परिस्थिती आहे.
मात्र या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. यामुळे जागतिक उर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे. नतान्झ हा इराणच्या अणु केंद्राचा कणा मानला जातो. शेकडो फूट जमिनीखाली असलेल्या या केंद्रात हजारो सेंट्रीफ्यूजच्या मदतीने युरेनियमचा साठा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जून २०२५ मध्ये देखील या अणु केंद्रावर अमेरिकेने हल्ला केला होता. परंतु इराणने काही काळातच हे केंद्र पुन्हा उभारले होते. आता मात्र प्रोजेक्ट हनी बॅजर अंतर्गत इराणचे बॉम्ब ग्रेड पूर्णपणे नष्ट करण्याची मोहिम अमेरिकेने हाती घेतली आहे.
सध्या या युद्धामुळे जागतिक अणु युद्धाचा धोका वाढला आहे. कारण इराणने यापूर्वीच इशारा दिला होता की, त्यांच्या अणु तळांना लक्ष्य करण्यात आल्यास ते आपल्या संरक्षणासाठी गंभीर पावले उचलतील.






