
फोटो सौजन्य सोशल मीडिया
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने बहरीनमधील अल-रिफा हेलिकॉप्टर तळावरील अमेरिकेच्या हवाई संरक्षण रडार यंत्रणेला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या कारवाईसाठी सहा ड्रोन सोडण्यात आल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून ही मोहीम राबवण्यात आल्याचे IRGC ने स्पष्ट केले. बहरीनमध्ये अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीचे महत्त्व लक्षात घेता या हल्ल्याच्या दाव्यामुळे आखाती देशांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इराणच्या हल्ल्याच्या दाव्यानंतर बहरीनमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली. देशाच्या अंतर्गत मंत्रालयाने नागरिक आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. नागरिकांनी शांतता राखावी आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी जावे, अशा सूचना देण्यात आल्या. बहरीनच्या संरक्षण दलाने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने अनेक इराणी हवाई हल्ले लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखल्याचे सांगितले. मात्र, अमेरिकन रडार यंत्रणेचे नुकसान झाले आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बहरीनमध्ये अमेरिकेच्या नौदलाची पाचवी फ्लीट (Fifth Fleet) तैनात आहे. त्यामुळे या देशाला अमेरिकेच्या आखाती लष्करी रणनीतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. यापूर्वीही १३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या पूर्वसूचना रडारला लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला होता.
मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळताना दोन इराणी ड्रोन पाडल्याचे आणि कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा बहरीनला लक्ष्य केल्याच्या दाव्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. आखाती देशांमधील लष्करी हालचाली आणि अमेरिकेची पुढील भूमिका याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.