Israel attacks oil tanker bound for Pakistan 24 crew members held hostage
इस्रायली ड्रोन हल्ल्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या एलपीजी टँकरला आग लागल्याचा गृहमंत्री मोहसिन नक्वी यांचा दावा.
जहाजावरील २४ पाकिस्तानी, २ श्रीलंकन आणि १ नेपाळी क्रू मेंबर्सना हुथी बंडखोरांनी ओलीस ठेवले.
सौदी अरेबिया व ओमानच्या मदतीने सर्व क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली; इस्रायलने हल्ल्याबाबत कोणतीही पुष्टी दिलेली नाही.
Israel attacks tanker : आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण करणारी मोठी घटना समोर आली आहे. पाकिस्तानकडे( pakistan) जाणाऱ्या एका द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (LPG) टँकरवर इस्रायली ड्रोन हल्ला झाल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. याच वेळी येमेनमधील हुथी बंडखोरांनी या जहाजाला अडवून २४ पाकिस्तानी, दोन श्रीलंकन आणि एक नेपाळी असे एकूण २७ क्रू मेंबर्स ओलीस ठेवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सुरुवातीला जाहीर केलेल्या निवेदनात इस्रायलचा थेट उल्लेख केला नव्हता. मात्र, गृहमंत्री नक्वी यांनी स्पष्टपणे म्हटले की, “१७ सप्टेंबर रोजी रस अल-ईसा बंदरावर (हूथींच्या ताब्यात असलेले) नांगरलेल्या जहाजावर इस्रायली ड्रोनने हल्ला केला. आग लागल्यामुळे मोठा स्फोट झाला, मात्र जहाजावरील क्रूने धाडस दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले.” नक्वी यांच्या मते, त्यानंतरच हुथींच्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या आणि संपूर्ण क्रू मेंबर्सना ओलीस ठेवण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र
हल्ल्याची आणि ओलीस नेण्याची माहिती समजताच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबिया व ओमानमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले. नक्वी यांनी सोशल मीडियावर लिहिले, “ज्या क्षणी आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची आशा मंदावत होती, त्याच वेळी सौदी आणि ओमानमधील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या सर्व क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यात आली.” पाकिस्तानकडून असेही सांगण्यात आले की, संबंधित दूतावास सतत येमेनमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होते. शेवटी सर्व क्रू मेंबर्स हुथींच्या ताब्यातून सोडले गेले आणि जहाजाने येमेनी पाणी सोडले.
गौरतलब बाब म्हणजे या घटनेबाबत इस्रायलने अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण हल्ल्याबाबत शंका उपस्थित होत आहे. काही तज्ञांच्या मते, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात नुकताच झालेला संरक्षण करार पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत इस्रायलवर थेट आरोप करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
या घटनेने ओलीस ठेवण्यात आलेल्या क्रू मेंबर्सच्या कुटुंबीयांची प्रचंड घालमेल झाली होती. पाकिस्तानमधील माध्यमांनुसार, कराचीतील कुटुंबीयांना सतत फोनद्वारे परिस्थिती विचारली जात होती. क्रूने जहाजावरील आगीवर नियंत्रण मिळवले हे कौतुकास्पद मानले जात आहे. मात्र, त्यानंतर हुथींच्या ताब्यात जाण्याची भीती त्यांच्यासाठी भयंकर होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Taiwan War : चीन लवकरच करणार तैवान काबीज; 800 पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील योजना आली जगासमोर
ही घटना केवळ पाकिस्तान आणि इस्रायलपुरती मर्यादित नाही. मध्यपूर्वेतील सामरिक राजकारण, तेलवाहतुकीची सुरक्षितता आणि समुद्री मार्गांवरील नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हुथी बंडखोर आधीच सौदी अरेबियाच्या विरोधात सक्रिय आहेत. आता त्यांनी पाकिस्तानी क्रूवर कारवाई केली यामुळे येमेनमधील तणाव अधिक वाढू शकतो.