ChinaTaiwan war : चीन लवकरच करणार तैवान काबीज; ८०० पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील योजना आली जगासमोर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
८०० पानांची लीक कागदपत्रे चीनच्या २०२७ पर्यंत तैवान ताब्यात घेण्याच्या धोकादायक योजनेचे संकेत देतात.
रशिया चीनच्या लष्करी तयारीसाठी शस्त्रसामग्री व प्रशिक्षण पुरवत असल्याचे पुरावे समोर आले.
रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटिश इंटेलिजेंसने कागदपत्रांच्या सत्यतेला पुष्टी दिली असून तैवान, फिलीपिन्ससह आशियाई बेटांवर हल्ल्याची तयारी असल्याचे नमूद.
China Taiwan invasion 2027 : आशिया खंडात युद्धाचे ढग गडद होत चालले आहेत. चीन-तैवान( China Taiwan) वाद हा नवा विषय नाही, परंतु नुकतीच समोर आलेली माहिती जगाला हादरवून टाकणारी आहे. ८०० पानांची लीक झालेली कागदपत्रे चीनच्या धोकादायक कारवायांचा पर्दाफाश करतात. या दस्तऐवजांतून उघड झाले आहे की बीजिंगने २०२७ पर्यंत तैवान ताब्यात घेण्याचा गुप्त आराखडा आखला आहे आणि या मोहिमेत रशियाही( Russia) चीनला थेट मदत करत आहे.
कागदपत्रांनुसार, मॉस्कोने चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीला आधुनिक उपकरणे, डझनभर हलकी चिलखती वाहने, पॅराशूट प्रणाली तसेच विशेष लष्करी प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही तर चीनच्या हवाई दलाला अधिक सक्षम करण्यासाठी तांत्रिक मदतही दिली जात आहे. या तयारीतून स्पष्ट होते की चीन केवळ तैवानच नव्हे तर फिलीपिन्स आणि शेजारील बेटांवरही आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zaporizhzhia Nuclear Plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा
रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटिश इंटेलिजेंस (RSI) या नामांकित संस्थेने या दस्तऐवजांच्या सत्यतेची खात्री दिली आहे. RSI च्या मते, हा करार चीनच्या लष्करी सामर्थ्यात मोठी भर घालणारा आहे. त्यामुळे भविष्यात आशियातील भू-राजकीय परिस्थिती अधिक तणावपूर्ण होऊ शकते.
अहवालानुसार, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतः लष्कराला आदेश दिले आहेत की २०२७ पर्यंत तैवानवर लष्करी कब्जा करण्यास सज्ज व्हावे. तैवानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की चीन-रशियामधील सहकार्याची पातळी सार्वजनिकरीत्या समोर आलेल्या माहितीपेक्षा खूपच खोलवर आहे.
चीन तैवानला आपल्या भूभागाचा भाग मानतो, तर अमेरिका सातत्याने तैवानच्या समर्थनात उभी आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या सहभागामुळे तो तिसऱ्या महायुद्धाची छाया निर्माण करू शकतो.
रशियाने युक्रेनवर हल्ला करताना ज्या प्रकारे पाश्चात्य निर्बंधांना तोंड दिले, त्यात चीनने त्याला महत्त्वाची साथ दिली. चीन हा रशियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला असून रशियाचे मोठे तेलसाठे चीनकडे गेले. त्यामुळे चीनला अपेक्षित होते की बदल्यात रशिया त्याच्या तैवान मोहिमेत सहाय्यकाची भूमिका निभावेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार
या धोकादायक हालचालींमुळे संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेश अस्थिरतेकडे झुकू शकतो. तैवान हा जागतिक अर्धसंवाहक (semiconductor) उद्योगाचा केंद्रबिंदू आहे. जर चीनने ते ताब्यात घेतले, तर जागतिक अर्थव्यवस्था, विशेषतः तंत्रज्ञान उद्योग, मोठ्या संकटात सापडू शकतो. ८०० पानांच्या कागदपत्रांतून उघड झालेली माहिती ही केवळ तैवानसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे. चीन-रशियाचे वाढते लष्करी सहकार्य आणि शी जिनपिंग यांचा २०२७ पर्यंतचा लष्करी आराखडा हे दाखवतात की आशियात संघर्षाचे ज्वालामुखी कधीही फुटू शकतात.