इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठा संघर्ष सुरु होता. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अमेरिकेच्या मध्यस्थीने इराण इस्त्रायलमध्ये युद्धबंदी झाल्याचे पाहायला मिळाले. इराणला पूर्णपणे नष्ट करण्याचा इरादा इस्त्रायलने बोलून दाखवला होता. त्याप्रमाणे इराणवर जोरदार हल्ले केले जात होते. आता पुन्हा एकदा इस्त्रायलने इराणच्या सर्वोच्च नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलने इराणचे सर्वोच्च नेते खामेनी आणा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या आधी देखील इस्त्रायलने हा प्रयत्न केला होता. मात्र इराणचे सर्वोच्च नेते खामेनी हे सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले होते. मात्र आता इस्त्रायलने पुन्हा एकदा त्यांना संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यानी ही धमकी दिली आहे. आमच्या देशाला इराणकडून धोका असेल तर, खामेनी सुरक्षित राहणार नाहीत.
तुम्ही इस्त्रायलविरुद्ध काही ना काही कुरापती करत राहिलात, आम्हाला त्रास देत राहिलात तर, आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळेस आम्ही मागील वेळेपेक्षा अधिक ताकदीने तुमच्यावर हल्ला करू. त्यामुळे आम्हाला त्रास किंवा धमक्या देऊ नका, तुमचे खूप मोठे नुकसान होईल,असे इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यानी म्हटले आहे. आमच्या हवाई दलाने खूप चांगले काम केले आहे. इराणने पुन्हा डोके वर काढले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.
मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार?
इराणच्या बुशहर शहरात सलग काही दिवस आकाशात अज्ञात वस्तू दिसत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर इराणी हवाई संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली असून, त्यांनी आकाशात अनेक इंटरसेप्टर क्षेपणास्त्रं डागली आहेत. त्याचबरोबर राजधानी तेहरानमध्येही स्फोट घडल्याची माहिती आहे. एका निवासी भागात झालेल्या स्फोटानंतर इमारतीला आग लागली आहे. हे सर्व घडत असतानाही इराणकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते इराणचं हे मौन एखाद्या मोठ्या वादळाच्या आधीची शांतता असू शकते.
नेतान्याहू इराणच्या लोकांना भडकवत आहेत
इराणी लोकांना उद्देशून एका नवीन व्हिडिओ संदेशात नेतान्याहू म्हणाले की, महिला स्वातंत्र्य हे इराणचे भविष्य आहे आणि मला यात शंका नाही की एकत्र मिळून हे भविष्य लोकांना वाटते त्यापेक्षा लवकर कळेल. नेतन्याहूच्या या व्हिडिओ संदेशाबाबत, इराणी प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे की, इराणींना भडकवणे आणि इस्रायलचा कट्टर शत्रू असलेल्या इस्लामिक रिपब्लिकच्या शासनाविरुद्ध असंतोषाची आग भडकवणे हा त्यांचा उद्देश स्पष्टपणे आहे.