Israel-Hamas conflict enters thrilling phase ceasefire fails 110 innocents killed in Gaza
Israel–Hamas ceasefire fails : सर्वात हृदयद्रावक घटना रफाहमधील अल-शकौश भागात घडली, जिथे लोक गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) च्या मदतीसाठी रांगेत उभे होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कोणतीही पूर्वसूचना न देता इस्रायली सैनिकांनी गर्दीवर थेट गोळीबार केला. यात ३४ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाझामध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले समीर शाट यांनी सांगितले की, “सर्वत्र रक्तच रक्त होतं, जणू रक्ताची नदी वाहत होती. आम्हाला ज्या पोत्यांमध्ये अन्न मिळण्याची आशा होती, त्या आता मृतदेह गुंडाळण्यासाठी वापरल्या जात होत्या. ही जागा अक्षरशः मृत्यूचा सापळा झाली आहे.” इतर प्रत्यक्षदर्शींनीही हल्ल्याचे भीषण वर्णन करताना सांगितले की, इस्रायली स्नायपर्सनी थेट नागरिकांना लक्ष्य केले. मोहम्मद बारबक आणि त्याचे वडील म्हणाले, “इस्रायलचे सैन्य आम्हाला फोन करतात, म्हणतात या, अन्नसाहित्य घ्या. पण जशी आम्ही पिशव्या उचलतो, तशी आमच्यावर गोळ्या झाडतात. आम्ही काय प्राणी आहोत का?”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत
युनायटेड नेशन्स आणि विविध आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी गाझामधील मदत केंद्रांना “मृत्यूचे सापळे” आणि “नरसंहाराची ठिकाणं” असे संबोधले आहे. गाझातील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, सामान्य नागरिक अन्नासाठी घराबाहेर पडण्याचेही धाडस करू शकत नाहीत.
गेल्या ४८ तासांमध्ये इस्रायलने गाझा पट्टीतील सुमारे २५० ठिकाणांवर हल्ले केले आहेत. यामध्ये हमासचे लपण्याचे अड्डे, शस्त्रास्त्रांचे डेपो, क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रे, स्नायपर ठिकाणे आणि भूमिगत बोगद्यांचा समावेश होता. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, हे सर्व हल्ले हमासच्या दहशतवादी नेटवर्कवर केंद्रित होते.
युद्धबंदीबाबत अमेरिका, कतार आणि इजिप्त यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्याने, इस्रायली सैन्याची भूमिका आता अधिक आक्रमक झाली आहे. त्याचवेळी इस्रायल सरकार गाझाच्या संपूर्ण लोकसंख्येला इतरत्र स्थलांतरित करण्याची योजना आखत आहे. या हालचालींना “सक्तीने बेदखल करणं” असे म्हणत पॅलेस्टिनी गटांनी जोरदार विरोध केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’
गाझा पट्टीतील परिस्थिती दिवसेदिवस अधिकच गंभीर होत आहे. अन्न, पाणी, औषधे आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे हजारो नागरिक मृत्यूच्या छायेखाली आहेत. युद्धबंदीच्या आशा आता फारच क्षीण झाल्या असून, संपूर्ण पश्चिम आशिया आणखी एका दीर्घ आणि रक्तरंजित संघर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे.