Israel is bombing aid camps in Gaza starving children are dying
Israel bombing Gaza aid camps : गाझा पट्टीतील मानवी संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अन्न, पाणी आणि औषधांच्या कमतरतेमुळे लाखो पॅलेस्टिनी नागरिक मृत्यूच्या छायेखाली जीवन जगत आहेत. याच दरम्यान, इस्रायली लष्कराने मदतीच्या छावण्यांवर गोळीबार केल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. इस्रायली वृत्तपत्र हारेत्झने आपल्या अहवालात याचा धक्कादायक खुलासा केला आहे. या अहवालानुसार, गाझामध्ये इस्रायली लष्कराने अन्न वितरण केंद्रांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. विशेषतः अशा वेळी, जेव्हा हजारो उपासमारग्रस्त नागरिक मदतीसाठी रांगेत उभे असतात. इस्रायली आयडीएफने या छावण्यांना ‘हत्या करण्याची जागा’ असे संबोधल्याची माहिती हारेत्झने दिली आहे.
गाझामध्ये अन्नाच्या प्रचंड टंचाईमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लहान मुलांना जमिनीवर पडलेले पीठ उचलून खाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक १० वर्षीय मुलगा म्हणतो, “मी सकाळपासून काहीही खाल्ले नाही, हे पीठ म्हणजे आशीर्वाद आहे.” या काळजाला चटका लावणाऱ्या दृश्यांवरून गाझामधील भयंकर वास्तव अधोरेखित होते. मुलांना वाळू खाण्यास भाग पाडले जात आहे आणि हजारो नागरिक उपासमारीमुळे मृत्युमुखी पडत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही ‘Fordow Nuclear Power Plant’च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ
हारेत्झच्या अहवालानुसार, इस्रायली लष्कराने अन्न वाटपापूर्वी आणि नंतर मशीनगन, ग्रेनेड लाँचर, टँक आणि मोर्टारसारख्या प्राणघातक शस्त्रांनी गोळीबार केल्याचा दावा केला आहे. २७ मेपासून अन्न वितरण केंद्रांच्या आजूबाजूला ५४९ लोकांचा मृत्यू झाला असून ४,००० हून अधिक जखमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या मदत छावण्यांवर GHF फाउंडेशनचे नियंत्रण असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ही फाउंडेशन अमेरिकन ख्रिश्चनांच्या मदतीने स्थापन झाली असून ती डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्याशी जवळीक राखते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
इस्रायलने गाझामध्ये अन्न वाटप केंद्रे उघडल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात, या केंद्रांमध्ये अन्न फक्त एक तासासाठी उपलब्ध असते आणि त्याठिकाणी होणाऱ्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असा आरोप आहे की, इस्रायल जगासमोर “मानवतावादी मदतीचा” देखावा करत आहे, पण प्रत्यक्षात गाझावासीयांना संदेश देत आहे की “आता तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.”
A Palestinian boy eats sand in anguish, crying from the merciless famine that left no food in Gaza. pic.twitter.com/2qCvNOQaA4
— PALESTINE ONLINE 🇵🇸 (@OnlinePalEng) June 19, 2025
credit : social media
डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या आठवड्यात गाझामध्ये युद्धविराम होऊ शकतो, असा दावा केला असतानाच, इस्रायलने हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. खान युनूसच्या तीन भागांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक करण्यात आली असून, ४० हून अधिक लोक ठार झाले आहेत. नासिर रुग्णालय आणि निर्वासित छावण्यांभोवतीही स्फोट घडवले जात असून, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामधील मानवीय संकट भीषण बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘डेथ टू इजरायल, डेथ टू अमेरिका…’ इस्रायली हल्ल्यात जीव गमावलेल्या लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना इराणचा अंतिम निरोप
गाझामधील या अमानुष घटनांमुळे संपूर्ण जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मानवाधिकार संघटनांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याची आणि तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गाझा युद्धाचा हा काळा अध्याय केवळ राजकीय संघर्ष नाही, तर मानवी मूल्यांचीही चाचणी आहे. जगाने आता मूक प्रेक्षक न राहता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.