ISRO military surveillance : ‘ऑपरेशन सिंदूर’ या अचूक आणि मर्यादित लष्करी मोहिमेच्या यशस्वीतेत भारतीय सैन्याच्या शौर्याइतकीच महत्त्वाची भूमिका भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बजावली आहे. इस्रोचे रिसॅट (RISAT) आणि कार्टोसॅट (Cartosat) या उपग्रहांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सैन्याला शत्रूच्या हालचालींबाबत सतत आणि अचूक माहिती पुरवली. विज्ञान आणि लष्कराच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शत्रूवर वीजेसारखा अचूक आणि गुप्त हल्ला चढवता आला.
रडार आणि उपग्रह, आकाशातील रणधुरंधर
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, इस्रोचे उपग्रह RISAT आणि Cartosat या दोघांनी २४ तास कार्यरत राहून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. RISAT उपग्रहात सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) प्रणाली असल्यामुळे ते ढग, धुके, अंधार आणि खराब हवामानातही अचूक छायाचित्रे घेऊ शकतात. दिवस-रात्र सातत्याने माहिती पुरवण्याच्या क्षमतेमुळे या मोहिमेत अत्यंत मोलाचा वाटा उचलला गेला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या हाती ‘ड्रॅगनचा खजिना’; चीनच्या ‘या’ गुप्त लष्करी तंत्रज्ञानावर जगाची नजर, ‘Five Eyes’ आणि फ्रान्सकडूनही मागणी
दुसरीकडे, Cartosat मालिकेतील उपग्रहांनी उच्च रिझोल्यूशन ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने इतक्या स्पष्ट छायाचित्रे पुरवली की, शत्रूचे बंकर, वाहने, रडार यंत्रणा आणि लाँचपॅड्स अचूकपणे ओळखले गेले. त्याच्या 1 मीटरहून कमी रिझोल्यूशनमुळे त्रिमितीय (3D) नकाशे तयार करणे शक्य झाले, जे लक्ष्य निवडणे, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग ठरवणे यासाठी अमूल्य ठरले.
सैन्याला मिळाली ‘डोळ्यांची’ आणि ‘मेंदूची’ साथ
या मोहिमेदरम्यान, उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे भारतीय हवाई दलाने अवघ्या २३ मिनिटांत शत्रूचे लक्ष्य यशस्वीरित्या नष्ट केले, तेही नियंत्रण रेषा ओलांडल्याशिवाय. प्रथमच पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले आणि त्याची रडार प्रणाली ‘अंध’ झाली. यामुळे भारताच्या क्षेपणास्त्रांना अडवणे शत्रूपक्षाला शक्यच झाले नाही. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, भारताच्या संरक्षणासाठी किमान १० उपग्रह २४x७ कार्यरत असतात. हे उपग्रह फक्त समुद्रकिनाऱ्यांवरच नव्हे तर, उत्तर, पश्चिम आणि पूर्व सीमेवरील संवेदनशील भागांवरही सतत लक्ष ठेवतात.
विज्ञान आणि सैन्य – शक्तीचा समन्वय
RISAT आणि Cartosat हे केवळ गुप्तचर माहितीच पुरवत नाहीत, तर दहशतवादविरोधी मोहिमा, आपत्ती व्यवस्थापन आणि सागरी सुरक्षेसाठीही अत्यंत उपयोगी ठरतात. त्यांच्या माहितीच्या आधारे मिशनचे अचूक नियोजन, लक्ष्य ओळखणे आणि धोरण ठरवणे अधिक परिणामकारक बनते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे सिद्ध केले आहे की जेव्हा विज्ञान आणि सैन्य एकत्र येतात, तेव्हा देशाची सुरक्षा बिनचूक आणि बळकट होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले; बलुचिस्तान नियंत्रणाबाहेर अन् स्वातंत्र्याची घोषणा
नव्या भारताचे तंत्रसज्ज संरक्षण
आज भारत फक्त सैनिकांच्या ताकदीवर नाही, तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर देखील युद्धक्षेत्रात आघाडीवर आहे. इस्रोच्या स्वनिर्मित उपग्रह प्रणालींमुळे भारत आता कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाचा वेळीच प्रतिकार करू शकतो, आणि हे ऑपरेशन सिंदूरच्या यशाने ठामपणे अधोरेखित केले आहे.
“आकाशातून माहिती, जमिनीवर प्रहार” हे सूत्र आज भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे नवे सामर्थ्य बनले आहे.