Lost 3,500-year-old city found in Peru a historic Caral breakthrough
Peñico lost city Peru : जगाच्या इतिहासात एक अद्वितीय भर टाकणारी शोधमोहीम अलीकडेच यशस्वी झाली आहे. पेरूच्या उत्तर भागातील बारांका प्रांतातील एका टेकडीवर ३५०० वर्षे जुने ‘पॅनिको’ हे प्राचीन शहर सापडले आहे. संशोधकांनी तब्बल ८ वर्षांच्या उत्खननानंतर या शहराचा शोध लावला आहे. हे शहर कॅरल संस्कृतीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हे संशोधन मानवी इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडावर प्रकाश टाकणारे ठरत आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर असलेल्या टेकाडावर वसलेले हे शहर इ.स.पू. १८०० ते १५०० या काळात अस्तित्वात होते, असे पुरावे समोर आले आहेत. या शहराची खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची वर्तुळाकार रचना, ज्याच्या मध्यभागी एक महत्त्वाचे केंद्र आहे. या केंद्राभोवती दगड व मातीच्या १८ इमारती सापडल्या असून, त्यात मंदिरे, घरे आणि इतर उपयुक्त रचनांचा समावेश आहे. या रचनेतून शहराचे सामाजिक व धार्मिक महत्त्व स्पष्ट होते.
सुरुवातीच्या अभ्यासानुसार, पॅनिको हे केवळ एक निवासी शहर नव्हते, तर एक समृद्ध व्यापारी केंद्रही होते. पॅसिफिक किनारपट्टीला अँडीज पर्वतरांगांशी आणि अमेझॉनच्या बेसिनशी जोडणारे हे शहर प्राचीन व्यापारी मार्गांवर एक महत्त्वाचे ठिकाण होते. उत्खननात आढळलेली शंखापासून बनवलेली दागिने, मातीच्या मूर्ती, व कलेचे नमुने दर्शवतात की या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक विधी मोठ्या प्रमाणात होत असत. यावरून हे दिसून येते की पॅनिको हे व्यापार, धर्म, समाज आणि संस्कृती यांचे एकत्रित केंद्र होते, जे त्या काळात अत्यंत विकसित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता ‘या’ दोन महासत्ता ठरणार मोठ्या महाविनाशामागचे कारण? आता NATO प्रमुखांचेही याबाबत गंभीर भाकीत
पॅनिको शहराचे स्थान व त्यातील स्थापत्यशैली ही कॅरल संस्कृतीशी अतिशय साम्य दर्शवते. कॅरल संस्कृती ही दक्षिण अमेरिकेतील सर्वात जुनी व सुपे व्हॅलीमध्ये विकसित झालेली प्राचीन संस्कृती मानली जाते. ती सुमारे ५००० वर्षांपूर्वीची असून, इजिप्त, सुमेर, भारत आणि चीनच्या प्राचीन संस्कृतींच्या समकालीन होती. मात्र, ती या संस्कृतींपासून पूर्णपणे स्वतंत्रपणे विकसित झाली. प्रख्यात पुरातत्व संशोधक डॉ. रूथ शीडी यांच्या मते, पॅनिकोचा शोध कॅरल संस्कृतीला नव्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
इ.स.पू. १५०० ते १८०० या काळात जेव्हा पॅनिको शहर फुलत होते, त्याच काळात जगात इतर ठिकाणी आशिया, अरबस्तानातही अनेक प्राचीन संस्कृती बहरत होत्या. हे सूचित करते की मानवी समाजाचा सांस्कृतिक व सामाजिक विकास जागतिक स्वरूपाचा होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन-पाक युतीत ताण? पाकिस्तानचा चिनी सामरिक तंत्रज्ञानावर अविश्वास; J-35 Fighter plane खरेदीच्या चर्चांना स्पष्ट नकार
पॅनिकोच्या शोधामुळे पेरू आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृतींबाबतचा दृष्टिकोन बदलू शकतो. हे शहर फक्त एक खोदकामाचे ठिकाण नाही, तर ते मानवजातीच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा पुरावा आहे. पॅनिकोमुळे कॅरल संस्कृती अधिक स्पष्टपणे समजेल, तसेच प्राचीन व्यापारी जाळे आणि सामाजिक व्यवस्था यांचेही नवे पैलू उघडकीस येतील. या संशोधनातून जगभरातील प्राचीन नागर संस्कृतींचा परस्परसंबंध आणि एकाच वेळी झालेला उत्क्रांतीचा प्रवास अधोरेखित होतो.