Lufthansa flight incident : १७ फेब्रुवारी २०२४ रोजी लुफ्थांसाच्या एका प्रवासी विमानात एक धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक घटना घडली. जर्मनीतील फ्रँकफर्टहून स्पेनच्या सेव्हिल शहराकडे जाणाऱ्या A321 प्रकाराच्या विमानात जवळपास १० मिनिटांपर्यंत कोणताही पायलट नियंत्रणात नव्हता. या वेळी विमानात १९९ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स उपस्थित होते. ही घटना घडली तेव्हा विमान ३६,००० फूट उंचीवर होते. विमानाचे मुख्य पायलट (कॅप्टन) वॉशरूमसाठी बाहेर गेले होते आणि कॉकपिटमध्ये फक्त सह-वैमानिक (को-पायलट) होता. या दरम्यान अचानक सह-वैमानिक बेशुद्ध पडला आणि त्यामुळे कॉकपिट पूर्णपणे रिकामे आणि निष्क्रिय झाले.
ऑटोपायलट प्रणालीमुळे टळला मोठा अपघात
या गंभीर प्रसंगी एकमेव दिलासादायक बाब म्हणजे ऑटोपायलट प्रणाली सक्रिय होती. त्यामुळे विमान स्थिर आणि नियोजित मार्गावर उडत राहिले. विमान अपघात तपास संस्था CIAIAC च्या प्राथमिक अहवालानुसार, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये या संकटाच्या क्षणांचे सर्व आवाज रेकॉर्ड झाले आहेत, आणि त्यावरून ही माहिती पुढे आली. विमानात असलेल्या एका एअर होस्टेसने कॉकपिटला फोन करून सह-वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय भूमिगत बोगद्यात हलवले जाणार; भारताच्या कारवाईची भीती की युध्दाच्या सावटाची चाहूल?
कॅप्टनने वापरला आपत्कालीन कोड
कॅप्टन जेव्हा परत आला, तेव्हा त्याने कॉकपिटमध्ये प्रवेश करण्यासाठी पाच वेळा नियमित सुरक्षा कोड वापरला, ज्यामुळे दरवाजा उघडण्याचा अलार्म झाला. परंतु, बेशुद्ध पडलेल्या को-पायलटकडून कोणतीही कृती झाली नाही. अखेर, कॅप्टनने आपत्कालीन ओव्हरराइड कोड वापरला, ज्यामुळे काही सेकंदांत दरवाजा आपोआप उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली.
या क्षणीच सह-वैमानिक शुद्धीवर आला आणि त्याने स्वतः दरवाजा उघडला. तो अत्यंत अस्वस्थ आणि आजारी स्थितीत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, कॅप्टनने विमानाचे मार्ग बदलून माद्रिद येथे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. लँडिंगनंतर सह-वैमानिकाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लुफ्थांसाने केली अंतर्गत चौकशी, पण माहिती गुप्त
जर्मन वृत्तसंस्था DPA ने दिलेल्या माहितीनुसार, लुफ्थांसा कंपनीला घटनेची पूर्ण माहिती आहे आणि त्यांनी आंतरिक पातळीवर सुरक्षा पथकाद्वारे चौकशीही केली आहे. मात्र, या चौकशीचे तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
विशेषज्ञांचा इशारा, एकट्या सह-वैमानिकावर अवलंबून राहणे धोकादायक
विमान अपघात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर ऑटोपायलट प्रणाली सक्रिय नसती, तर ही घटना प्रचंड जीवितहानीमध्ये परिवर्तित झाली असती. ही घटना एकप्रकारे कॉकपिटमध्ये एकच पायलट असल्यास काय होऊ शकते याचे भीषण उदाहरण आहे. अशा प्रसंगात दुसरा प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असणे किती आवश्यक आहे, हे यामुळे पुन्हा अधोरेखित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर
सुदैवाने टळली मोठी दुर्घटना, पण प्रश्न अनुत्तरित
या संपूर्ण घटनेत प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित राहिले, ही बाब नक्कीच सुदैवी आहे. मात्र, अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी वैमानिकांच्या आरोग्य तपासण्या, ड्युटी नियोजन आणि तांत्रिक सुरक्षा व्यवस्था यांची पुन्हा पाहणी होणे अत्यावश्यक आहे. ही घटना सर्व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी एक गंभीर इशारा आहे. फक्त तंत्रज्ञानावर नव्हे, तर माणसाच्या क्षमतेवरही पूर्ण विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.