Mahakumbh 2025 Pakistan Tops Google Searches for Mahakumbh Information
इस्लामाबाद: पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने सोमवारपासून महाकुंभाची सुरुवात झाली आहे. महाकुंभचा उत्सव फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेले नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. महाकुंभ आता जागतिक स्तरावर महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व बनला आहे. तीर्थराज प्रयागराज येथे सोमवारी महाकुंभाचा भव्य प्रारंभ झाला असून, ब्राझील, जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका आणि स्पेन यांसारख्या देशांमधून श्रद्धाळू प्रयागराज येथे पोहोचत आहेत.
पाकिस्तान हा महाकुंभ शोधणाऱ्या देशांच्या यादीत
हा उत्सव सनातन संस्कृतीचा जागतिक प्रभाव वाढवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गूगल ट्रेंड्सनुसार, पाकिस्तानसारख्या भारताच्या शेजारी देशांनीही या महाकुंभाबाबत विशेष रस दाखवला आहे. पाकिस्तान हा महाकुंभ शोधणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे, यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. भारताशी परस्पर विरोधी संबंध असलेल्या या देशात महाकुंभाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
इतर देशांनी केले महाकुंभावर सर्च
तसेच पाकिस्ताननंतर कतर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहरीन यांसारख्या इस्लामिक देशांनीही या भव्य सोहळ्याबाबत रुची व्यक्त केली आहे. याशिवाय नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, ब्रिटन, थायलंड आणि अमेरिका यांसारख्या देशांमधील लोकही महाकुंभाबाबत माहिती शोधत आहेत.
महाकुंभामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रद्धाळूंची वाढती संख्या ही सनातन संस्कृतीचा जागतिक स्तरावर होणारा प्रभाव दर्शवते. संगम तटावर केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी भाविकही मोठ्या संख्येने डुबकी घेत आहेत. या सोहळ्याने भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि सनातन धर्माच्या शक्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे.
जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचे महत्त्व
महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीनिमित्त अमृत स्नानाचा मोठा सोहळा पार पडला. या दिवशी 3.50 कोटींहून अधिक श्रद्धाळूंनी संगम तटावर डुबकी घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या अमृत स्नान पर्वात लाखो संत आणि भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान करून पुण्य प्राप्त केले. महाकुंभ 2025 ने जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. इस्लामिक देशांतही या सोहळ्याबद्दल वाढलेली उत्सुकता ही भारतीय संस्कृतीच्या व्यापकतेचा पुरावा आहे. महाकुंभाने जगभरातून लाखो भाविकांना एकत्र आणत सनातन धर्माचा दिव्य संदेश पसरवला आहे.