Major anti-dictatorship protests erupt in the U.S. as thousands rally against Trump
वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त आणि जनविरोधी धोरणांविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून, हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे. देशातील विविध शहरे, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., शिकागो, लॉस एंजेलिस आणि फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिल येथे सुमारे ४०० ठिकाणी निदर्शने आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे देशातील लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरी हक्क धोक्यात आले आहेत. त्यांचा आरोप आहे की ट्रम्प सरकार कायद्याचे राज्य कमकुवत करत आहे, सामान्य नागरिकांचे हक्क पायदळी तुडवत आहे आणि हुकूमशाही वृत्तीने कारभार करत आहे.
या निदर्शनांची पार्श्वभूमीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर स्वतःचा उल्लेख “राजा” असा केल्याने संतापाची ठिणगी पडली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारीला ‘नाइन किंग्ज डे’च्या नावाने निदर्शने झाली होती. २० जानेवारी रोजी ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही चौथी मोठी निदर्शने होती. या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विविध गटांनी एकत्र येऊन ट्रम्प सरकारच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय धोरणांचा निषेध केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेश पोलिसांचा मोठा निर्णय; शेख हसीना यांच्याविरुद्ध इंटरपोलकडे ‘Red Corner Notice’ची मागणी
नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारी बहुआयामी आहेत. त्यात प्रमुख म्हणजे
सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात
आर्थिक धोरणांचा बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम
बेरोजगारी वाढणे
मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्यावर मर्यादा
प्रेस पूलमधून काही वृत्तसंस्थांना काढून टाकणे
इमिग्रेशन धोरणांमध्ये कठोर बदल
यामुळे समाजात असंतोष वाढत असून, अनेकांनी ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्या धोरणांना देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशिया-युक्रेन युद्धात 30 तासांची युद्धबंदी; 500 युद्धकैद्यांची झाली सुटका
निदर्शनाचे आयोजन करणाऱ्या गटांची प्रवक्त्या हीदर डन यांनी स्पष्ट केले की, “ही चळवळ कोणत्याही हिंसेविरुद्ध आहे. आमचा उद्देश कोणालाही इजा करणे नसून देशातील संविधानाचे रक्षण करणे आणि एक प्रामाणिक, पारदर्शक सरकार निर्माण करण्यासाठी आवाज उठवणे हा आहे.” ही चळवळ केवळ डेमोक्रॅट पक्षापुरती मर्यादित नसून, रिपब्लिकन, अपक्ष, आणि विविध सामाजिक गट एकत्र येत आहेत, ही बाब विशेष लक्षवेधी आहे.
अमेरिकेतील या निदर्शनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही, तर ती नागरिकांच्या जागरूकतेवर आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहभागावर अवलंबून असते. ट्रम्प प्रशासनाच्या कारभारावर असंतोष इतका वाढला आहे की, जनतेने आता व्यापक स्तरावर संघटित होऊन संविधानाच्या रक्षणासाठी मोर्चा उघडला आहे. यामुळे केवळ अमेरिकेतीलच नाही, तर जागतिक स्तरावरही लोकशाही मूल्यांवर चर्चा घडवून आणण्याची ही चळवळ ठरण्याची शक्यता आहे.